पणजी : काव्या कोळस्कर
पणजीत दरवर्षी आयोजित करण्यात येणारा लोकोत्सव यंदाही कला, संस्कृती आणि विशेषतः खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे नागरिक व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. गोवा तसेच देशातील विविध राज्यांतील कारागिरांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनात यंदा पारंपरिक खाद्यसंस्कृतीने देखील विशेष रंगत आणली आहे.
लोकोत्सवातील खाद्य विभाग हा यंदाच्या प्रदर्शनाचा केंद्रबिंदू ठरला असून, इथे गोव्याचे अस्सल पारंपरिक पदार्थ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. फिश करी-भात, शाकुती, काफ्रेल, शिरवळ्या तसेच स्थानिक गोड पदार्थांना मोठी पसंती मिळत आहे. गोवन खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी स्थानिकांसह देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने स्टॉल्सवर गर्दी करताना दिसत आहेत.
यासोबतच राजस्थानी, मारवाडी, महाराष्ट्रीयन तसेच इतर राज्यांच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हे देखील लोकोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले आहे. दालबाटी चूरमा, कचोरी, घेवर, जलेबी, बाजरी भाकरी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, मुंबईची प्रसिद्ध पावभाजी तसेच तिथल्या स्थानिक पारंपरिक पदार्थांसाठी या स्टॉल्ससमोर दिवसभर लांब रांगा पाहायला मिळाल्या.
पारंपरिक पद्धतीने प्रत्यक्ष स्वयंपाक होत असल्याने खवय्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, शुद्ध व अस्सल चवीमुळे ग्राहकांचा प्रतिसाद सातत्याने वाढल्याचे काही स्टॉल मालकांनी सांगितले.
भारतीय खाद्यपरंपरेचाही महोत्सव
लोकोत्सव केवळ हस्तकला प्रदर्शनापुरता मर्यादित न राहता, तो भारतीय खाद्यपरंपरेचा अनुभव देणारा महोत्सव बनला आहे. या खाद्य स्टॉल्समुळे छोटे व्यावसायिक, स्थानिक उद्योजक आणि पारंपरिक स्वयंपाक करणाऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत असून, त्यातून त्यांचे अर्थकारणही मजबूत होत आहे. हस्तकलेसोबत विविध राज्यांच्या चवींचा संगम साधणारा लोकत्सव हा कला, संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीचा उत्सव ठरत असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रदर्शनाच्या यशाची साक्ष देत आहे.