गोवा काँग्रेस अधिवेशनात फक्त अर्धे ‘वंदे मातरम्’, मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित file photo
गोवा

Vande Mataram : गोवा काँग्रेस अधिवेशनात फक्त अर्धे ‘वंदे मातरम्’, मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित, भाजपची टीका

भाजपने काँग्रेसवर निशाणा साधत सोनिया गांधींसह पक्षाच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले.

पुढारी वृत्तसेवा

panaji half vande mataram in goa congress convention mallikarjun kharge also present

पणजी : पुढारी ऑनलाईन ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरून सध्या भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. याचदरम्यान गोव्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या दोन कडव्यांचे गायन केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधत सोनिया गांधींसह पक्षाच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’चे गायन मध्येच थांबवल्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमधील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. याचदरम्यान सोमवारी गोव्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एका कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ गायले. मात्र, त्यांनी राष्ट्रगीताची सुरुवातीची दोनच कडवी गायली. गोवा काँग्रेसच्या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षातील इतर नेत्यांनी ‘वंदे मातरम्’चे गायन केले.

पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता

या घटनेनंतर भाजपकडून काँग्रेसवर पुन्हा एकदा हल्लाबोल होण्याची शक्यता आहे. कारण एका व्हिडिओवरून भाजप आधीपासूनच काँग्रेसला घेरत आहे. या व्हिडिओमध्ये सोनिया गांधी कथितरित्या दोन कडवी गायल्यानंतर राष्ट्रगीत थांबवण्याचा इशारा करताना दिसत असल्याचा भाजपचा दावा आहे.

मात्र, काँग्रेसने भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेसचे म्हणणे आहे की, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ची संपूर्ण आवृत्ती गायली गेली होती. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी राष्ट्रगीत थांबवण्याचा इशारा देत नव्हत्या, तर बराच वेळ उभे असलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी त्या खुर्ची मागत होत्या.

अमित शाह यांनीही सोनिया गांधींवर साधला होता निशाणा

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाच्या नेतृत्वाने राष्ट्रगीताचा घोर अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी शाह यांनी काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणी केली होती.

दरम्यान, पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गोवा भाजपचे प्रवक्ते दाजी कृष्ण सालकर यांनी आरोप केला की, काँग्रेसने १९३७ मध्ये ‘वंदे मातरम्’चे गायन धर्मनिरपेक्ष नसल्याचे सांगत ते छोटे केले होते.

राहुल गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत नसल्याचे म्हटल्याचा दावाही भाजप प्रवक्त्यांनी केला. ‘वंदे मातरम्’बद्दलच्या आपल्या भूमिकेमुळे काँग्रेस पूर्णपणे उघडी पडली आहे. त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही सालकर यांनी केली.

सालकर म्हणाले- काँग्रेसने माफी मागावी

सालकर यांनी म्हटले की, “ज्या प्रकारे त्यांनी १९३७ मध्ये ‘वंदे मातरम्’चे तुकडे केले, त्याचप्रमाणे १९४७ मध्ये देशाची फाळणी केली.”

त्यांनी पुढे दावा केला की, भाजपनेच संपूर्ण राष्ट्रीय गीत गाण्याची परंपरा सुरू केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) मुख्यालयातील एका व्हिडिओचा उल्लेख करत भाजप प्रवक्त्यांनी आरोप केला की, काँग्रेस नेत्यांच्या वर्तनावरून ते ‘वंदे मातरम्’च्या विरोधात असल्याचे स्पष्ट होते.

काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ गाणे आवडत नसल्याचे मान्य करावे, असेही सालकर यांनी म्हटले. सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’चे गायन थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे लोकांनी पाहिल्याचा दावा त्यांनी केला. तसेच राहुल गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत नसल्याचे म्हटल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘वंदे मातरम्’बद्दलच्या भूमिकेमुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असून, काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजप प्रवक्ते दाजी कृष्ण सालकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT