पणजी : पुढारी वृत्तसेवा राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रविवारी अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. रस्ते, वीज वाहिन्यावर झाडे पडून वाहतूक व वीज प्रवाह बंद होण्याच्या घटना घडल्या असून काही रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरभागातून रस्त्यावर दगड व माती कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
पणजी कांपाल येथील इएसजी समोरील रस्त्यावर रस्त्याकडेचे झाड काल रात्री रस्त्यावर पडले. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी ते लगेच हटवून रस्ता मोकळा केला. पणजी रायंबंदर जुने गोवेे रस्त्यावर बायंगिणी येथेही रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक वळवावी लागली. उघड्यावर भरणार्या आठवडी बाजारावरही परिणाम झाला आहे. जोरदार पावसामुळे तापमान खाली आले असून पणजीत कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस झाले आहे तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.
दरम्यान, उद्या दि. 27 रोजी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर पुढील चार दिवस सातत्याने पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. राज्यात पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून समुद्राला भरती येतानाच नदी व नाल्याचे पात्र तुडुंब भरून वाहत आहे. असाच पाऊस पुढील चार दिवस कोसळला तर नदी काठच्या घरांत पाणी शिरण्याची तथा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सुर्ला येथे रिवे गावातून वीजपुरवठा पुरविण्यात आलेला आहे. रिवे-सुर्ला या चार किलोमीटर अंतरामध्ये भूमिगत केबल टाकून ही व्यवस्था केली होती. त्यानंतर वीज वाहिन्या ओढून या गावांमध्ये वीजपुरवठा देण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी सदर वीजवाहिन्यांवर झाड पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. दोन दिवस वीज नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी वीज कार्यालयाशी संपर्क सुविधा पूर्वपदावर आणण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन कर्मचार्यांनी सदर ठिकाणी धाव घेऊन वीजपुरवठा पूर्ववत केला.
शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या जोरदार पावसामुळे झालेल्या पडझडीमुळे अग्निशामक दलाची बरीच दमछाक झाली नाही. सकाळी पराष्टे येथे मोठे झाड पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. त्यानंतर भारतीय जनता पक्ष कार्यालयाजवळ मालपे येथे नारळाचे झाड पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांसाठी व वाहनांसाठी रस्ता मोकळा केला. यामध्ये प्रामुख्याने अग्नीशामक दलाचे हवालदार विठ्ठल परब, जवान अमोल परब, जवान राजेश परब, जवान अमित सावळ व नगरपालिकेचे कामगार यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा