माऊलींचा पालखी सोहळा उद्या सातारा जिल्ह्यात | पुढारी

माऊलींचा पालखी सोहळा उद्या सातारा जिल्ह्यात

लोणंद : पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यामध्ये मंगळवार दि. 28 रोजी आगमन होणार आहे. यासाठी सर्व विभाग सज्ज झाले आहे. तब्बल दोन वर्षानंतर माऊलींचे आगमन होत असल्याने भाविकांचे पालखीकडे डोळे लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर वरिष्ठ अधिकार्‍यांकडून वारंवार आढावा घेवून वारकर्‍यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, पालखी सोहळा काळात भाविकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांनी दिली.

दोन वर्षाच्या कालखंडानंतर संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा जिल्ह्यात येणार आहे. लोणंद येथे अडीच दिवसांचा तर फलटण तालुक्यात चार मुक्‍काम असणार आहे. दिवे घाटातून पालखी मार्गस्थ होवून जिल्ह्याच्या वेशीलगत आली आहे. जून महिन्याचा अखेर आल्यानंतरही पावसाने दडी मारल्याने भाविकांचा पालखी मार्ग सुकर झाला आहे. मंगळवारी नीरा स्नान करून माऊलींची पालखी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यानंतर ती लोणंदकडे मार्गस्थ होणार आहे.

पालखीचे आगमन होण्यापूर्वी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधकिशन पवार, तालुका आरोग्य डॉ. अविनाश पाटील, अतिरिक्‍त आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य सेवा पुरवल्या जाणार आहेत.

वारकर्‍यांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विहिरी तसेच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत्र टी.सी.एल पावडरव्दारे शुध्दीकरण करून 24 तास आरोग्य यंत्राणा काम करणार आहे. भाविकांसाठी एक सार्वजनिक विहिर, खासगी 18, हातपंप 8, जॅकवेल, 1, बोर विद्युत पंप 6 आणि 12 टँकर फिलींग पॉईंटद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. यासाठी 18 जणांची टीम व 59 पर्यवेक्षक काम करणार आहेत. भाविकांच्या उपचारासाठी 7 स्थिर पथके, 105 डॉक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका यांच्या मार्फत उपचार केले जाणार आहे.

याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र, पालखी तळ, सईबाई सोसायटी, बाळासाहेब देसाईनगर येथे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. जलद उपचारासाठी 3 रूग्णवाहिका व 4 मोठी स्थिर पथके कार्यरत राहणार आहेत. वारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व हॉटेलमधील स्वच्छता, पाणी शुध्दीकरण तपासणी कामासाठी चार स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. चिकुनगुणिया आणि डेंग्यू या साथजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 90 जणांच्या 45 टीम करण्यात आल्या आहेत. या टीमने संपूर्ण शहरातील सर्व्हेक्षण केले असून दुषित भांडी रिकामी करण्यात आली आहेत.

याचबरोबर भाविकांना आरोग्य सुविधा व आरोग्यवरील उपचारांचासाठी सल्ला देण्यासाठी कंट्रोल रूम तयार केली आहे. वारी कालावधीत बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठीही दोन पथके नियुक्‍त करण्यात आली आहेत.

वारकर्‍यांसाठी आरोग्यदुतांची नेमणूक

वारीदरम्यान 17 दुचाकी वाहनांवर एक समुदाय आरोग्य अधिकारी व एक आरोग्य कर्मचारी औषधासह उपलब्ध राहणार आहे. गर्दीतून लवकर उपचार करण्यासाठी हे आरोग्य दूत काम करणार आहे. भाविकंच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पालखी तळावर केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यासाठी स्वतंत्र आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

Back to top button