Goa ONGC Project Light  
गोवा

Goa ONGC Project Light | "ओएनजीसीच्या तीव्र प्रकाशामुळे मच्छीमारांना धोका! आमदार क्रूझ सिल्व्हा यांची संयुक्त बैठकीची मागणी"

Goa ONGC Project Light | बेतूल–कुटबण नदीमुख परिसरातील ओएनजीसी प्रकल्पातून रात्रीच्या वेळी पडणाऱ्या तीव्र प्रकाशामुळे मच्छीमारांच्या नौकानयनात गंभीर अडथळे निर्माण होत असून, जीवित व मालमत्तेला धोका निर्माण झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

बेतूल–कुटबण नदीमुख परिसरातील ओएनजीसी प्रकल्पातून रात्रीच्या वेळी पडणाऱ्या तीव्र प्रकाशामुळे मच्छीमारांच्या नौकानयनात गंभीर अडथळे निर्माण होत असून, जीवित व मालमत्तेला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वेळीचे आमदार क्रूझ सिल्व्हा यांनी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना पत्र पाठवून सर्व संबंधित विभागांची तातडीने संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.

आमदार सिल्व्हा यांनी १३ जुलै रोजी पाठविलेल्या पत्रात कुटबण बोट मालक महासंघाने उपस्थित केलेल्या समस्येचा उल्लेख केला आहे. ओएनजीसी प्रकल्पातील अतिप्रखर आणि चुकीच्या दिशेने पडणाऱ्या प्रकाशामुळे नदीमुखातील नैसर्गिक मार्गदर्शक चिन्हे आणि जलमार्ग स्पष्ट दिसत नसल्याने मच्छीमारांना समुद्रात जाताना तसेच परतताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नौका भरकटण्याचा तसेच अपघात होण्याचा धोका वाढल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मत्स्यव्यवसाय विभाग, गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ओएनजीसीचे अधिकारी, कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभाग, बेतूल व कावेलोशी ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी, बेणौली व कुळचडे मतदारसंघांचे आमदार तसेच संबंधित तांत्रिक विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बैठकीत उपाय निश्चितीबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT