

डॉ. दीपक शिकारपूर
लंडनच्या वॉडस्वर्थ काऊंटी कोर्टात ब्रिटनमधील एका विशेष मान्यताप्राप्त ‘एआय’ लॉ फर्मने मानवी वकिलांच्या तगड्या फौजफाट्याविरुद्ध थेट न्यायालयात खटला जिंकून इतिहास रचला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता हे आजच्या युगातील सर्वात मोठे तंत्रज्ञान परिवर्तन मानले जात आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य, संशोधन, वित्तीय सेवा आणि शासन व्यवस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. लंडनच्या वाँडस्वर्थ काऊंटी कोर्टात एका अशा ऐतिहासिक घटनेची नोंद झाली आहे, ज्याने जगभरातील कायदेतज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. ब्रिटनमधील एका विशेष मान्यताप्राप्त ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) लॉ फर्मने मानवी वकिलांच्या तगड्या फौजफाट्याविरुद्ध थेट न्यायालयात खटला जिंकून इतिहास रचला आहे. ‘गॅरफिल्ड एआय’ नावाच्या या एआय संचलित फर्मने एका फ्रीलान्सर महिलेला तिचे थकलेले ७००० पाऊंड (सुमारे ८.८ लाख रुपये) परत मिळवून दिले.
या खटल्यामध्ये एआयने दावे आणि कायदेशीर कागदपत्रे तयार केली, नोटिसा पाठवल्या, पुराव्यांचे वर्गीकरण केले, साक्षीदारांचे लेखी जबाब तयार केले, न्यायालयीन फाईल तयार केली. कोर्टातील प्रत्यक्ष सुनावणी, साक्षीदारांची उलट तपासणी, न्यायाधीशांच्या प्रश्नांची उत्तरे आणि अंतिम तोंडी युक्तिवाद मानवी बॅरिस्टर यांनी केला. एआयने स्वतः बोलून युक्तिवाद केला नाही; पण इतिहास घडला तो यासाठी की, जवळपास संपूर्ण पूर्वतयारी एआयने केली. विशेष म्हणजे, न्यायालयाने त्या कागदपत्रांवर कोणतीही गंभीर आक्षेपार्ह त्रुटी नोंदवली नाही. दावा मंजूर झाला आणि विरोधी पक्षाचा प्रतिदावा फेटाळण्यात आला.
कायद्याच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश नवा नाही; परंतु या निकालाने ‘एआय केवळ मदतनीस आहे की थेट स्पर्धा’ या वादाला पूर्णविराम दिला आहे. एआयचा वापर संशोधनासाठी केला जात होता; मात्र आता पूर्ण खटला उभा करण्याची क्षमता एआयने सिद्ध केली आहे. या खटल्यामध्ये विरोधी पक्षाने तज्ज्ञ वकील आणि बॅरिस्टरची मोठी टीम मैदानात उतरवली होती, तर एआय वापरणाऱ्या महिलेला पूर्वतयारीसाठी अवघा ४०० पाऊंड खर्च आला. हा निकाल न्यायव्यवस्थेचे लोकशाहीकरण करणारा मानला जात आहे. कारण, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत कमी खर्चात आणि वेळेत दर्जेदार कायदेशीर मदत मिळणे शक्य होणार आहे.
भविष्यात डेटा अॅनालिसिस, प्रेडिक्टिव्ह कोडिंग आणि कायदेशीर दस्तावेजांचे स्वयंचलित विश्लेषण यामध्ये एआयचा दबदबा असेल. हजारो पानांचे जुने निकाल आणि गुंतागुंतीचे कायदे काही सेकंदांत स्कॅन करून अचूक युक्तिवाद तयार करण्याचे काम एआय करेल. यामुळे खटले चालवण्याचा वेग प्रचंड वाढेल आणि वकिली क्षेत्रातील जुनी, संथ कार्यपद्धती इतिहासजमा होईल. भारतात सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालये निकालांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी आणि दैनंदिन व्यवस्थापनासाठी एआयचा वापर करत आहेत. कोणताही वकील एआयच्या मदतीशिवाय वेगाने काम करूच शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कागदपत्रांचे मसुदे तयार करणे, करारांमधील पळवाटा शोधणे आणि केस लॉचे संशोधन करणे यासारखी प्राथमिक कामे आता एआय असिस्टंटकडे सोपवली जात आहेत.
भारताची कायदेशीर आणि सामाजिक रचना ब्रिटन किंवा इतर पाश्चात्त्य देशांपेक्षा खूप वेगळी आहे. भारतीय न्यायालयांमध्ये गर्दी, स्थानिक भाषांमधील गुंतागुंत दिसते. येथे साक्षीदारांच्या उलट तपासणीवेळी मानवी चातुर्य आणि न्यायाधीशांसमोर प्रत्यक्ष उभे राहून भावनिक व तार्किक बाजू मांडण्याचे कौशल्य लागते. केवळ कायद्याचे ज्ञान पुरेसे नसते, तर मानवी स्वभाव समजून घेणे, प्रत्यक्ष संवाद साधने आणि प्रसंगावधान राखणे अत्यंत आवश्यक असते. ब्रिटनमधील विधिज्ञांच्या मते, या खटल्यानंतर आता आगामी काळात छोट्या दाव्यांसाठी न्याय मिळवणे स्वस्त आणि जलद होईल. सामान्य नागरिकांना न्यायालयापर्यंत पोहोचणे सोपे होईल. नियमित कागदपत्रांचे काम एआय उत्कृष्टरीत्या करू शकते, तरीही एआयने तयार केलेल्या कागदपत्रांवर मानवी देखरेख आवश्यकच राहील. आज एआय न्यायालयातील वकिलाची जागा घेणार नाही; पण एआय वकिलाचा अत्यंत सक्षम सहायक (लीगल को-पायलट) बनेल. संशोधन, मसुदे, पुरावे आणि दस्तावेजीकरण यामध्ये जाणारा वेळ व खर्च त्यामुळे मोठ्या प्रमाणात कमी होईल.