सुलक्षणाताईंचा सल्ला
पूर्वी राजकीय कार्यक्रमात अॅक्टिव्ह असणाऱ्या सुलक्षणा सावंत यांनी अलीकडे स्वतःला शैक्षणिक संस्थेसाठीच वाह्न घेतले आहे. पूर्वी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष असताना त्या सभा गाजवायच्या. घणाघाती भाषणे करायच्या. आता साहित्य मेळावे, महिला मेळावे, इतर साहित्यिक कार्यक्रमांना मात्र त्या आमंत्रण असल्यास न चुकता उपस्थिती लावतात. समयोचित भाषण करणे ही त्यांची खासियत आहे. गेले काही दिवस नारी शक्तीवंदन विधेयकाची मोठी चर्चा होती. दुर्दैवाने संसदेत ते विधेयक फेटाळले गेले. एका साहित्यिक कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून बोलताना त्यांनी आवाहन केले की महिलांनी राजकीय आरक्षणावरही साहित्याच्या माध्यमातून भाष्य करावे. महिलांची ताकद आणि साहित्याची ताकद त्या ओळखतात. म्हणूनच सुलक्षणाताईंनी वरील सल्ला दिला असावा.
पक्ष संघटनेतील फरक
भारतीय जनता पक्ष हा मजबूत संघटना असलेला पक्ष आहे. देशभरामध्ये त्याचे चित्र दिसून येते. मंगळवारी पणजीत भाजपच्या महिला नेत्या व कार्यकर्त्यांनी काँग्रेसने नारीशक्ती वंदना या महिलांना राजकारणामध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला विरोध केल्याच्या निषेधार्थ भव्य निषेध मोर्चा काढला. त्यात हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. काँग्रेसच्या मोर्चावेळी अवघ्याच महिला सहभागी होतात, कारण त्या पक्षाचे संघटन मजबूत नाही. अशा प्रसंगी या दोन्ही पक्षातील फरक ठळकपणे जाणवतो.
शिक्षण फुकट जात नाही, पण...
रद्द झालेल्या फोंडा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने फक्त कोकणीच अस्मिता असणाऱ्या काही लोकांनी गुजराती, हिंदी अशा अनेक भाषा शिकून काही मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोकणीच्या परीघाबाहेर जाऊनही शेवटी काही लाभ झालाच नाही. फोंडा पोटनिवडणूक रद्द झाली असती तर निकालावर याचा काय परिणाम झाला हे कळले तरी असते. मात्र निवडणूक रद्द झाली. अर्थातच कोणतेही शिक्षण फुकट जात नाही. २०२७ साली विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हा फोंड्यासह, मडगाव, वास्को, पणजीतही याचे प्रयोग काही जणांना करता येणार आहेत.
... मग अपमान समजू नये
या दिवसांत मोबाईल पत्रकारांची संख्या वाढली आहे. हाती मोबाईल असलेली व्यक्ती आपण सोशल मीडिया पत्रकार म्हणून सांगतात. मंत्री, आमदारांना विविध प्रश्न विचारतात. त्यांना अनेकवेळा मुख्यमंत्री व इतर मंत्री उत्तर न देता पुढे जातात, कारण हे सोशल मीडिया पत्रकार विषय सोडून प्रश्न विचारतात, ज्यामुळे वाद वाढण्याची शक्यता असते. फेसबुक लाईव्ह पाहताना ही गोष्ट दिसून येते. त्यामुळे सोशल मीडिया पत्रकार म्हणवणाऱ्यांनी दर्जा सांभाळावा व नंतर अपमान केला असे म्हणायची पाळी येऊ देऊ नये
एकदा बाण सुटला, आता सारवासारव...
नारीशक्ती अधिनियम विधेयकाला काँग्रेस व त्याच्या मित्र पक्षांनी विरोध केला हे सर्व देशाने पाहिले. कारण लोकसभेचे कामकाज लाईव्ह होते. त्यामुळे काँग्रेस व त्यांचे सहकारी पक्ष महिला विरोधी आहेत, असा संदेश देशभर गेला. विशेषतः महिलांचा रोष काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी ओढवून घेतला आहे. याची जाणीव आता या पक्षाच्या नेत्यांना होत असून आपण का विरोध केला होता त्याची विविध कारणे हे नेते आता सांगत आहेत. पण, बाण सुटला, आता सारवासारव करून लाभ नाही, हे मात्र खरे.
पंचायतीचे ठराव आणि मराठी राजभाषा
काही वर्षापूर्वी कोकणी सोबत मराठी राजभाषा व्हावी, असे ठराव राज्यातील ९० टक्के पंचायतीनी घेतले होते. तरी मराठी राजभाषा झाली नाही. सहराजभाषा म्हणून नावालाच तिला संधी दिली जाते. आता पुन्हा एकदा मराठी राजभाषेसाठी आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे काही पंचायतींनी कोकणीसोबत मराठी राजभाषा व्हावी, असे ठराव घेण्यास सुरुवात केली आहे. ही संख्या वाढायला हवी. कारण मराठी राजभाषेसाठी ही शेवटची लढाई आहे.
मुख्यमंत्र्यांनी केला कुंकळ्ळीत 'गोल'
मागचा आठवडा केवळ देखावा आणि प्रतीकात्मकतेने गाजला; कारण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कुंकळळी येथील फुटसाल मैदानात स्वतः पाऊल ठेवले आणि विशेष म्हणजे, हे मैदान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा राजकीय बालेकिल्ला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला कुंकळळी येथे फुटसाल मैदानाचे उद्घाटन करताना फुटबॉलला किक मारण्यासाठी सज्ज झालेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत. सार्वजनिक क्रीडा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची मुख्यमंत्र्यांना तशी काही नवीन सवय नाही, तरीही त्यांचा हा सहभाग मात्र विशेष ठरला. युरी आलेमाव आणि काँग्रेसचे आमदार एल्टन डीकोस्टा यांच्या उपस्थितीत, मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शांतपणे चेंडू थेट रिकाम्या गोलजाळ्यात धाडला. हा क्षण कोणाच्याही नजरेतून सुटला नाही. दोन्ही विरोधी पक्षनेते हे दृश्य पाहत असतानाच, मैदानाबाहेरून आलेल्या एका टिप्पणीने त्यावेळचा संपूर्ण माहोलच टिपलाः "मुख्यमंत्र्यांनी कुंकळळीच्याच मैदानावर गोल नोंदवला आहे." आहे का कोणाला हिंमत, याला प्रत्युत्तर देण्याची?
अडचणीचे रूपांतर संधीत
अडचणीचे रूपांतर संधीत कसे करावे यात राजकीय नेते अगदी तरबेज असतात. वास्कोत गौतम खट्टर यांनी वादग्रस्त विधान करून ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावल्यानंतर विजनवासात गेलेले काही नेतेही आता मैदानात येऊन खट्टर यांचा निषेध करत आहेत. त्यांचे विधान निषेधार्ह आहेच. पण ज्या त-हेने राजकीय नेते त्याचे राजकीय भांडवल करत आहेत ते वाखाणण्याजोगे आहे. अनेक पोलिस स्थानकांवर आंदोलकांसमवेत ते उपस्थिती लावत आहेत.
स्नेहबंधातील ठेव ही
कुडचडेतील सामाजिक कार्यकर्ते, बीसीसीआयचे माजी संयुक्त सचिव, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे खंदे समर्थन रोहन गावस देसाई यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. स्नेहबंध : सामान्य ते मुख्यमंत्री असा एक उपक्रम सुरू केला असून हा मतदार आणि मुख्यमंत्र्यांमधील दुवा म्हणून काम करणार असा त्यांचा दावा आहे. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस याच आठवड्यात असून त्याचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जीसीएचे माजी सचिव असलेल्या रोहन गावस देसाई आता थेट कुडचडेच्या मैदानात उतरले आहेत. निवडणूक वर्ष असल्याने अनेकांना धास्ती आहे, तशी अनेकांना संधीही आहे.