Sunburn Festival Mumbai Pudhari
गोवा

Goa Sunburn Festival | ध्वनिप्रदूषण उल्लंघनप्रकरणी सनबर्न आयोजकांना दणका

Goa Sunburn Festival | १० लाखांच्या सुरक्षा ठेव जप्तीवर एनजीटीचे शिक्कामोर्तब

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

वागातोर येथे डिसेंबर २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सनबर्न संगीत महोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) आयोजकांना मोठा धक्का दिला आहे.

लवादाने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (जीएसपीसीबी) जप्त केलेली १० लाख रुपयांची सुरक्षा ठेव कायम ठेवण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. २८ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान झालेल्या सनबर्न महोत्सवादरम्यान ध्वनीची पातळी परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळून आली होती.

त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने ६ एप्रिल २०२३ रोजी प्रदूषक भरपाई तत्त्व लागू करत आयोजकांकडून जमा करण्यात आलेली सुरक्षा ठेव जप्त केली होती. या निर्णयाविरोधात सनबर्नचे आयोजक स्पेसबाउंड वेब लाऊस प्रायव्हेट लिमिटेडने लवादाकडे अपील दाखल केले होते. कंपनीने ध्वनी निरीक्षण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोवा ध्वनी कृती योजनेनुसार १६ तास निरीक्षण होणे अपेक्षित असताना केवळ आठ तासांचेच मोजमाप करण्यात आल्याचा दावा केला होता.

तसेच वागातोर परिसरातील वाहतूक, पर्यटकांची गर्दी, हॉटेल्स, बार आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमुळे निर्माण होणारा सभोवतालचा आवाज महोत्सवामुळे झालेल्या ध्वनिप्रदूषणापासून वेगळा करता येत नसल्याचेही कंपनीने नमूद केले होते. लवादाचे न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. सुजित कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठाने सनबर्न कंपनीचे हे युक्तिवाद फेटाळून लावले. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईसाठी सुरक्षा ठेव जमा करण्यात आली होती आणि उल्लंघन सिद्ध झाल्यानंतर ती जप्त करणे योग्य असल्याचे लवादाने स्पष्ट केले.

पूर्वीच्या निकालांचाही आधार

निर्णय देताना लवादाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या पूर्वीच्या निकालांचाही आधार घेतला. उच्च न्यायालयाने यापूर्वी ध्वनी निरीक्षण अहवालांची वैधता मान्य केली असल्याचे एनजीटीने नमूद केले. या निर्णयामुळे पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोठ्या कार्यक्रम आयोजकांना स्पष्ट संदेश मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT