पणजी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यूप्रकरणी पणजी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि मृत्यूच्या परिस्थितीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मृत्यूशी संबंधित परिस्थितीची पडताळणी केली जात आहे. त्यांच्या पार्थिवाचे विच्छेदन गोमेकॉ इस्पितळाच्या तीन सदस्यीय डॉक्टरांच्या पथकाने केले होते. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील तपासणी केली जाईल. मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी आवश्यक तपास करण्यात येत आहे. तपासातून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘बीएनएसएस’ कलम १९४ अंतर्गत येणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेनुसार, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू (ब्रॉट डेड) झालेल्या प्रत्येक प्रकरणात पोलिसांकडून अशी नोंद केली जाते. याचा अर्थ मृत्यू संशयास्पद आहे किंवा घातपात झाला आहे, असा होत नाही तर ही एक अनिवार्य कायदेशीर-वैद्यकीय (मेडिको-लिगल) प्रक्रिया आहे.
नवीन कायद्यानुसार (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता - बीएनएसएस), जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घरात अचानक झाला असेल किंवा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला असेल तर मृत्यूच्या कारणाची कायदेशीर खात्री करणे पोलिसांना बंधनकारक असते. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि तपासात मृत्यू नैसर्गिक कारणामुळेच (हृदयविकाराचा झटका) झाल्याचे स्पष्ट झाल्यावर ही फाईल नियमानुसार अधिकृतपणे बंद केली जाईल.