मडगाव : पुढारी वृत्तसेवा
पती-पत्नीमधील कौटुंबिक वादाचा फटका दोन निष्पाप अल्पवयीन मुलांना बसल्याची धक्कादायक घटना मडगावजवळील दवर्ली येथे उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून दोन चिमुकल्यांना बेदम मारहाण करून त्यांना घराबाहेर काढत रस्त्यावर असहाय अवस्थेत सोडल्याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी आई नाझनीन बेगम आणि तिचा भाऊ अयुब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांचे वडील दिगंबर चणेकर यांनी मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, दिगंबर चणेकर आणि नाझनीन बेगम हे पती-पत्नी असून गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कौटुंबिक वाद सुरू होता.
या वादातून दोन्ही अल्पवयीन मुलांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे. मुलांच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून आई आणि तिच्या भावाविरुद्ध संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला.
अल्पवयीन मुलांवर शारीरिक अत्याचार करणे, त्यांना मानसिक त्रास देणे तसेच त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा परिस्थितीत त्यांना घराबाहेर सोडणे हा कायद्याने गंभीर गुन्हा मानला जातो.
परिसरात तीव्र नाराजी
तक्रारीनुसार, नाझनीन बेगम आणि अयुब यांनी दोन्ही मुलांना बेदम मारहाण केली. त्यांना घराबाहेर हाकलून देत रस्त्यावर सोडून दिल्याचा आरोप आहे. घरातील वादाचा राग निष्पाप मुलांवर काढत त्यांना असुरक्षित अवस्थेत सोडल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.