

किनवट : किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांत चार वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवनगरी गोकुंदा येथून १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक नळावरील वादातून अनुसूचित जातीच्या महिलेला जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. धामणधरी येथे शेतातील जनावरांच्या वादातून काकाने पुतण्याला मारहाण केल्याची नोंदही पोलिसांत झाली आहे.
किनवट शहरातील मार्कंडेयनगर येथे सार्वजनिक नळावरील पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादात अनुसूचित जातीच्या महिलेचा विनयभंग, जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५१(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, पाण्याच्या मोटारीवरून झालेल्या वादानंतर आरोपींनी जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
दुसऱ्या घटनेत दिलेल्या फिर्यादीनुसार, शेतात शिरलेल्या जनावरांबाबत जाब विचारल्याचा राग मनात धरून फिर्यादीच्या काका आणि काकूंनी वाद घातला. यावेळी काकांनी फिर्यादीला ढकलून खाली पाडत हातातील लाकडाने मारहाण करून दुखापत केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, टिंगणवाडी येथील १९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून तरूणाविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ६४(१) व ६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने प्रेमसंबंध प्रस्थापित करून लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
याशिवाय शिवनगरी, येथून १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी २७ जूनच्या रात्री घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्यावडिलांनी दिली आहे. नातेवाईकांकडे शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून तिला पळवून नेल्याच्या संशयावरून भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचाही तपास पोलीस करीत आहेत. या चारही प्रकरणांचा पुढील तपास किनवट पोलिसांकडून सुरू असून संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.