सांगे : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन वर्षांपासून गाजत असलेल्या मिराबाग सावर्डे येथील प्रस्तावित असलेल्या ५० एमएलडीच्या बंधाऱ्याला ग्रामस्यांनी प्रखर विरोध दर्शविला. २८० कोटी रुपये खर्च करून, गाव बुडवून कोणाच्या कल्याणासाठी हा प्रकल्प आणला जातो, हे कोणालाच माहीत नाही. सरकार आमच्याकडे खेळ मांडतोय.
लोकांची सतावणूक करून, आम्हाला अंधारात ठेऊन हा प्रकल्प आणला जातो. जुवारीचे अस्तित्व संपायला आम्ही देणार नाही. गाव राखण्याची जबाबदारी आमची आहे आणि गावात लोकांना नको असलेल्या प्रकल्पाला आमचा प्रखर विरोध आहे.
आम्ही ठाम मारून इथे बसणार. या बंधाऱ्याच्या विरोधात पुढील रविवारी याच जागेत मोठी सभा होणार आहे, असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. आम्ही मेलो तरी चालेल पण बंधारा होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्यांनी सरकारला दिला यावेळी संकेत भंडारी यांनी सांगितले की, गावावर जे संकट आलेले आहे; त्याला योग्य पद्धतीने तोंड देऊन हा बंधारा आम्ही उधळून लावणार.
हा प्रकल्प लोक हितासाठी आहे, असे म्हणणाऱ्या लोकांनी बंधाऱ्या विषयी सर्व माहिती समजून सांगावी. गावावर संकट आणण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही कदापि गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी उपेंद्र नाईक यांनी सांगितले की, बंधाऱ्याच्या नावाचे गावांवर मोठे संकट आलेले आहे.
त्यासंकटात राजकारणी कोणीच साथ देत नाही. या प्रकल्पा विषयची माहिती कोणीच सांगू पाहत नाही. जेव्हा २८० कोट्यवधी रुपये खर्च करतात तेव्हा लोकांना विश्वासात घेऊनच पुढे जायला पाहिजे होते. लोकांना विश्वासात का घेत नाही? प्रेजेंटेशन का दाखवत नाहीत, आमचा एकजूट असलेला गाव बिघडवू नका, तसे झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन करू, असे ते म्हणाले.
खोटी आश्वासने देऊन फसवणूक :
आपा नाईक आपा नाईक यांनी सांगितले की, खोटी आश्वासने देऊन गावातील लोकांना अंधारात ठेऊन विरोध असलेल्या जागी हा प्रकल्प आणून गावात मोठे संकट आणण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. लोकांवर सरकार अन्याय करीत आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.
.. पण आता गप्प बसणार नाही:
विश्वमाला नाईक विश्वमाला नाईक यांनी सांगितले की, आम्ही या प्रकल्पाला विरोध करण्याचा खूप प्रयत्न केला. मंत्री सुभाष शिरोडकर यांनी, जर लोकांना नको तर मला पण नको, असे सांगितले होते. या विश्वासावर आम्ही गप्प बसलो; पण आता गप्प बसणार नाही. यासाठी आम्ही उपोषणही करू.