Mining 
गोवा

Goa Shirgaon Mining Economic Environmental Loss|खाणकामामुळे शिरगावला अर्थकारणाचा फटका

Shirgaon Mining Economic Environmental Loss- पाच दशकांत ९७७ कोटींचे नुकसान, पर्यावरणीय मोठी हानी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पाच दशकांच्या खाणकामामुळे डिचोली तालुक्यातील शिरगाव गावातील नैसर्गिक साधनसंपत्ती, शेती, जलस्रोत, जंगल, मत्स्यव्यवसाय आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचा दावा एका संस्थेमार्फत करण्यात आलेल्या प्राथमिक मूल्यांकन अहवालात करण्यात आला आहे. गोवा फाउंडेशनने सोमवारी (दि. २३) पत्रकार परिषदेत हा अहवाल जाहीर केला.

पाच दशकातील खाणकामाचा आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम मोजण्याचा प्रयत्न या अभ्यासातून करण्यात आला आहे. त्यानुसार, शिरगावचे प्रत्यक्ष आर्थिक नुकसान सुमारे ९७७.२८ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. नैसर्गिक परिसंस्थेचे नुकसान, कार्बन उत्सर्जनामुळे होणारी हवामानविषयक हानी आणि परिस्थितिकीय पुनर्वसनाचा खर्च धरल्यास हा संभाव्य आर्थिक फटका सुमारे ४ हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे.

याउलट, शिरगावातील खाणपट्ट्यांमधून काढलेल्या लोहखनिजाच्या विक्रीतून सुमारे ७ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सागर धारा यांच्या प्रमुख अन्वेषकत्वाखाली 'सॅपॅक' संस्थेने ग्रामस्थांच्या निमंत्रणावरून हे प्राथमिक मूल्यांकन केले आहे. गोवा फाउंडेशनचे क्लॉड अल्बारेस यांनी अभ्यासासाठी पार्श्वभूमीची कागदपत्रे आणि स्थानिक सहकार्य उपलब्ध करून दिले.

गावाच्या ५७.७ टक्के क्षेत्रावर खाणकामाचे सावट

शिरगावचे एकूण क्षेत्रफळ सुमारे २८९ हेक्टर असून, २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १,६९७ आणि कुटुंबांची संख्या ३६१ आहे. गावाच्या पूर्व आणि दक्षिण दिशेला टेकड्या, वनक्षेत्रे आणि बागायती असून, पश्चिमेला अस्नोडा नदी तसेच सावट आणि खरट ही खाजणे आहेत. शेती, मासेमारी आणि स्थानिक व्यवसाय हे गावातील उपजीविकेचे प्रमुख आधार आहेत.

अहवालातील जमीन-वापराच्या आकडेवारीनुसार, गावातील १६६.७५ हेक्टर क्षेत्र खाणकामाशी संबंधित आहे. म्हणजेच गावाच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ५७.७ टक्के भागावर खाणकामाचे क्षेत्र पसरले आहे. दुसरीकडे, भातशेती आणि खाजन जमिनींचे क्षेत्र सुमारे ८४.४१ हेक्टर आहे. त्यामुळे खाणकामाचा परिणाम केवळ खाणपट्ट्यांपुरता मर्यादित न राहता शेती, घरे, जलस्रोत आणि गावातील नैसर्गिक व्यवस्थेवरही होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

खाणपट्ट्यात समावेश

शिरगावची ओळख श्री देवी लईराई मंदिर आणि प्रसिद्ध वार्षिक जत्रेमुळे आहे. मंदिर, पवित्र स्थळे, जलस्रोत आणि गावाच्या पारंपरिक भूरचनेचा परस्परांशी जवळचा संबंध असल्याचे अहवालात नमूद आहे. डिसेंबर २०२२ मध्ये सरकारने जुन्या खाणपट्ट्यांचे तीन खाण ब्लॉकमध्ये विभाजन करून त्यांचा लिलाव केला. या प्रक्रियेत श्री देवी लईराई मंदिरासह गावाचा वस्तीभागही खाणपट्टा क्षेत्रात समाविष्ट झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यातील खाणकामाचा परिणाम आर्थिक बाबींव्यतिरिक धार्मिक परंपरा आणि सामुदायिन जीवनावरही होण्याची शक्यता व्यक करण्यात आली आहे.

नवीन खाणकामापूर्वी जुन्या हानीचे मूल्यांकन व्हावे

शिरगावमध्ये नव्याने खाणकाम सुरू करण्याचा विचार करण्यापूर्वी मागील पाच दशकांत झालेल्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय हानीचे सर्वंकष मूल्यांकन करावे, तसेच आवश्यक पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी अहवालातून करण्यात आली आहे. खाणकामातून निर्माण झालेल्या आर्थिक उत्पन्नाच्या तुलनेत स्थानिक पातळीवर झालेल्या नुकसानाचा स्वतंत्रपणे विचार करण्याची गरज या अभ्यासातून अधोरेखित करण्यात आली आहे.

विहिरींची भूजलपातळी घटली

खाणकामामुळे निर्माण झालेल्या खोल खड्ड्यांमधून पाणी उपसले जाणे आणि त्याचा गावातील विहिरींच्या भूजलपातळीवर परिणाम होणे यांचा संबंध अहवालात जोडण्यात आला आहे. खार्णीमधून बाहेर पडणारा गाळ शेतजमिनी, ओढे आणि नदीत मिसळल्याने जमिनीची उत्पादकता कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. खाजन जमिनीतील पाण्याचे नियमन करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या बांध आणि स्लूइस गेट व्यवस्थेवरही खाणकामामुळे परिणाम झाल्याचे अहवालात नमूद आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बागायती, वनोत्पादन आणि मासेमारीत घट झाली आहे. खाणकामामुळे धुळीचे प्रदूषण वाढले, जमिनीचे नुकसान झाले आणि काही ग्रामस्थांना स्थलांतर करावे लागले. खाणींच्या आसपासच्या घरांना स्फोटांमुळे तडे गेल्याच्या तक्रारीही अभ्यासात नोंदवण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT