monsoon Pudhari File Photo
गोवा

Goa News | म्हापशात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

Goa News | बार्देश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी आणि शहरातील पूर्वतयारीबाबत व्यक्त झालेल्या साशंकतेची दखल घेत बार्देश तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

टुगेदर फॉर म्हापसा संघटनेने शहरातील मान्सूनपूर्व कामांबाबत प्रश्न उपस्थित करत आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा जाहीर करण्याची तसेच मॉक ड्रिल घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली. बैठकीस म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, मामलेदार, कार्यकारी वीज अभियंता, अग्निशमन दलाचे अधिकारी,

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कृषी व वन विभागाचे अधिकारी, पोलिस निरीक्षक, नागरी आरोग्य केंद्राचे अधिकारी, जलस्रोत खात्याचे सहायक अभियंता, नागरी पुरवठा निरीक्षक तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टुगेदर फॉर म्हापसा संघटनेचे अध्यक्ष अॅड. महेश राणे, विजय भिके आदींनीही बैठकीत सहभाग घेतला. बैठकीत शहरातील विविध समस्या उपस्थित करण्यात आल्या. अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता असलेल्या नाल्यांची स्थितीही चर्चेत मांडण्यात आली. यापूर्वी झालेल्या बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत कोणताही पूर्तता अहवाल सादर करण्यात आला नसल्याची बाबही उपस्थित करण्यात आली.

यावेळी उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पावसाळ्यात निर्माण झालेल्या समस्यांची दखल घेण्यात आली असून यंदा त्या समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांच्या पथकांमार्फत गस्तही घालण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT