

सातारा : नगरपालिकेच्या कोणत्याही बैठकीपूर्वी नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी सर्व नगरसेवकांबरोबर बसून चर्चा करावी. त्यांच्या काय सूचना आहेत त्या समजून घ्याव्यात. प्रत्येक नगरसेवकाला वाटते आपल्या वॉर्डात कामे व्हावीत त्यासाठी नगरसेवकांमध्ये समन्वय असला पाहिजे, अशा सूचना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिल्या. दरम्यान, कोणाही नगरसेवकांमध्ये हेवेदावे नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
नगरपालिकेच्या सभेत झालेल्या वादानंतर खा. उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी हॉटेल फर्न येथे दोन्ही गटाच्या नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, आजची मिटींग नगरसेवकांमधील समन्वयासाठी होती. शहरातील विविध भागात विकासकामे कशी मार्गी लावता येतील याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आलेल्यांना प्रशासनाने सहकार्य केले पाहिजे. अतिक्रमण होवू नये यासाठी सीईओंना मी व शिवेंद्रराजे यांनी सूचना केल्या आहेत. नगरपालिका हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जागा आहेत त्या ठिकाणी हॉकर्स झोन करावेत जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत.
खा.उदयनराजे भोसले म्हणाले, कोणत्याही मिटींगपूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्षांनी एकत्रित बसून सर्वांबरोबर चर्चा करावी. नगरसेवकांच्या काय सूचना आहेत त्या ऐकून घ्याव्यात. माझा एक वॉर्ड आहे, शिवेंद्रराजेंचा वॉर्ड आहे, मला वाटते माझ्या वॉर्डात कामे व्हावीत हेच जर अगोदर बसून ठरले तर वाद होणार नाहीत. प्रत्येकाला ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्यांची कामे मार्गी लागली पाहिजेत, असे वाटणे स्वाभाविक आहे. खा. उदयनराजे म्हणाले, युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाई वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक जण विवंचनेत आहे. शासनाने लाडकी बहिण योजना राबवल्यामुळे ताण खूप वाढला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून निधी पाहिजे त्या प्रमाणात येत नाही. व्यवस्थित नियोजन करून कशी कामे करता येतील, त्यातून कसा मार्ग काढता येईल, एवढ्यासाठीच ही बैठक घेण्यात आल्याचे ते म्हणाले.