गोवा

Eco Friendly Clay Ganpati Idols | साच्याविना घडतात मनमोहक गणेशमूर्ती! मांद्रेच्या हरमलकर बंधूंनी जपला चिकणमातीचा वारसा

Eco Friendly Clay Ganpati Idols | मांद्रे येथील मूर्तिकार संदेश हरमलकर यांनी जपला पारंपरिक चिकणमातीच्या मूर्तीकलेचा वारसा

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
गणेशमूर्ती घडविणे ही केवळ हंगामी कला किंवा व्यवसाय नसून त्यासाठी मातीची निवड, मातीचे योग्य प्रमाण, मूर्तीची बांधणी, आकार, प्रमाणबद्धता आणि रंगकाम यांचे परिपूर्ण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. योग्य प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण अभ्यासानेच या कलेत नैपुण्य मिळवता येते, असे प्रतिपादन मांद्रे येथील युवा मूर्तिकार संदेश हरमलकर यांनी केले.

वडिलांकडून मिळालेला हा कलेचा वारसा संदेश हरमलकर आणि त्यांचे बंधू अविरतपणे पुढे नेत आहेत. विशेष म्हणजे या चित्रशाळेत केवळ चिकणमातीच्याच गणेशमूर्तींसह मांद्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच अगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीही त्यांच्या हस्तकलेतून साकारल्या जातात.

मूर्तीकलेत करिअरचीही मोठी संधी

हस्तकलेतून गणेशमूर्ती तयार करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांनी प्रथम या कलेचे व्यवस्थित प्रशिक्षण घ्यावे, असा सल्ला हरमलकर यांनी दिला. कोणत्या प्रकारची आणि किती माती वापरायची, मूर्तीचा सांगाडा व आकार कसा घडवायचा, विविध अवयवांचे प्रमाण कसे राखायचे, मूर्तीला सुबक रूप कसे द्यायचे, याचा अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजारात गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात तयार मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातात. मात्र बाहेरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तयार मूर्ती आणून केवळ विक्री करणारे आणि प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने मूर्ती घडविणारे पारंपरिक मूर्तिकार यांच्यात फरक आहे, असे हरमलकर यांनी सांगितले.

गणेशभक्तांची आवड आणि मागणी बदलत असून पर्यावरणपूरक व पारंपरिक चिकणमातीच्या मूर्तींना प्राधान्य देणाऱ्या भक्तांची संख्या वाढत आहे. धार्मिक परंपरा आणि पर्यावरणाचा विचार करून गणेशभक्तांनी चिकणमातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन हरमलकर यांनी केले.

स्वतःचे भविष्य घडवा : संदेश हरमलकर

'पारंपरिक मूर्तीकला टिकवायची असेल तर नव्या पिढीने या क्षेत्रात यायला हवे. मात्र केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर प्रशिक्षण, मेहनत आणि कलेविषयी निष्ठा घेऊन या क्षेत्रात आले तर साच्याशिवाय स्वतःच्या हस्तकलेतून सुंदर गणेशमूर्ती घडविता येतील आणि या कलेतून स्वतःचे भविष्यही घडविता येईल,' असा संदेश युवा मूर्तिकार संदेश हरमलकर यांनी नवोदित कलाकारांना दिला.

'मूर्तिकारांचे अनुदान वेळेत द्यावे'

पारंपरिक गणेशमूर्तिकारांना सरकारकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल हरमलकर यांनी समाधान व्यक्त केले. यंदा गणेशमूर्तींसाठी प्रति मूर्ती २०० रुपये अनुदान जाहीर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी हे अनुदान वेळेत मिळाले होते. यंदाही पारंपरिक मूर्तिकारांना अनुदान लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT