

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
पेडणे तालुक्यातील मोप, तांबोसे आणि उगवे परिसरातील शेतकऱ्यांसाठी 'ओंकार' हत्ती पुन्हा एकदा मोठे संकट बनला आहे. चार महिन्यांच्या अंतरानंतर या भागात परतलेल्या ओंकारने बागायतींमध्ये घुसून केळी, पोफळी आणि इतर पिकांची नासधूस सुरू केली आहे. कष्टाने उभ्या केलेल्या बागायती डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
'नुकसान झाल्यानंतर भरपाईचे आश्वासन देण्यापेक्षा नुकसान होऊच नये, यासाठी ओंकारचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून आमच्या शेतीला संरक्षण द्यावे,' अशी आक्रमक मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी तथा माजी सरपंच शंताराम महाले, पंच सदस्य दयानंद (दया) गवंडी, माजी पंच अशोक परब, श्री. सामंत यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सरकार आणि वन खात्याच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
सोमवारी, २४ ऑगस्ट रोजी सकाळी मोपा परिसरातील मुख्य रस्त्यावर ओंकार हत्तीने जवळपास दोन तास ठाण मांडल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. हत्ती रस्त्यावर असल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची कोंडी झाली.
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच कामावर जाणाऱ्या नागरिक आणि कामगारांना वेळेत पुढे जाता आले नाही. वन खात्याचे कर्मचारी ओंकारला रस्त्यावरून सुरक्षितपणे हटवण्यासाठी प्रयत्न करत होते; मात्र बराच वेळ त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे हा प्रश्न आता नागरिकांच्या सुरक्षेशीही थेट जोडला गेला आहे, याकडे लक्ष वेधले.