मालवण : पुढारी वृत्तसेवा
शहरातील सागरी महामार्ग येथे हॉटेल आराध्य नजीक शुक्रवारी मध्यरात्री १२ वा. च्या सुमारास तहसीलदार मालवण व पोलिस निरीक्षक यांनी नेमलेल्या संयुक्त पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गोवा पासिंगच्या सहा डंपरवर धडक कारवाई केली.
मालवण शहराला लागून असलेल्या सागरी महामार्गावर हॉटेल आराध्यनजीक २६ डिसेंबर रोजी रात्री १२ ते १२.१५ वा.च्या दरम्यान ६ डंपरमधून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळताच ही अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर मंदार केणी, वैभव मयेकर, मंगेश गोवेकर व इतर स्थानिक ग्रामस्थांनी अडविले. ही बाब तत्काळ मालवण पोलीस ठाण्यास कळवण्यात आली.
या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक मालवण यांचे पथकामार्फत डंपरची तपासणी केली असता वाहनामध्ये वाळू आढळून आली. सध्या वाळू वाहतूक करण्याची कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी नाही. हे डंपर अनधिकृतपणे वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक मालवण यांनी तहसीलदारांना दिली. त्यानंतर तहसीलदार मालवण यांच्या सूचनांनुसार घटनास्थळी महसूल पथक उपस्थित झाले. हे डंपर ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी मालवण तहसील कार्यालय आवारात लावण्यात आले आहेत.