

कोल्हापूर/सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा
पुणे बंगळूर महामार्गावर कणेरीवाडी (ता. करवीर) येथील पेट्रोल पंपाजवळ ५ कोटी २४ लाख ९० हजार रुपये किमतीची ५ किलो २४९ ग्रॅम व्हेल माशाची उलटी हस्तगत करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणने सापळा रचून कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच पलायन करणाऱ्या मुख्य संशयितासह तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
तस्करीत गुंतलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. मुख्य संशयित संभाजी श्रीपती पाटील (वय ७८, रा. चंद्रे, ता. राधानगरी), प्रमोद ऊर्फ पिंटू शिवाजी देसाई (४८, चिक्कल वहाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव), अनिल तुकाराम महाडिक (५५, मुगळी, ता. गडहिग्लज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांविरुध्द गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार, मोपेड हस्तगत करण्यात आली आहे. व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत आणखी काही साथीदारांची नावे पुढे येत आहेत. कोकण पट्टयातील सराईत गुन्हेगारही तस्करीत सक्रिय असल्याचे समजते. व्हेल माशाच्या उलटीला 'अंबरग्रीस' असे म्हणतात. ही जी उलटी हस्तगत करण्यात आली ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील काही संशयितांकडून आणण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. संबंधितांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.
चालू वर्षातील कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे-बंगळूर महामार्गावर व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीची खबर पोलिसांना होती. उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव यांच्यासह पथकाने कणेरीवाडीजवळील पेट्रोलपंपाजवळ सापळा रचला होता. त्याचवेळी मोटारीतून दोन अनोळखी व्यक्ती पेट्रोलपंप परिसरात आल्या.
पाठीला सॅक लावलेली एक व्यक्ती मोपेडवरून आली. पोलिसांची चाहूल लागताच तिघेही वाहनातून पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. परंतु पोलिसांनी शिताफीने तिघांनाही ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या घेतलेल्या झडतीत सॅकमध्ये व्हेलमाशाची उलटी आढळून आली. मुख्य संशयित संभाजी पाटीलसह तिघांकडे सखोल चौकशी करण्यात आली.
संभाजी पाटील याने व्हेलमाशाची उलटी मालवण येथून विक्रीसाठी कोल्हापुरात आणल्याचे निष्पन्न झाले. प्रमोद उर्फ पिंटू देसाई आणि अनिल महाडिक हे दोघेजण उलटी खरेदीसाठी आल्याची माहिती निष्पन्न झाली आहे, असेही सांगण्यात आले. जेरबंद संशयितावर यापूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का, याची पोलिस माहिती घेत आहेत.
असा आहे कायदा
अरबी समुद्रात देवमासा जी उलटी करतो ती समुद्रात तरंगते. ती थोडी कडक असते. तस्करी करणाऱ्यांना ती समुद्रात सापडते किंवा किनाऱ्यावरही आढळते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची कोट्यवधीची किंमत आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये देवमासा म्हणजेच व्हेल मासा संरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे व्हेल माशाची उलटी विकणे बेकायदेशीर आहे.