Nitin Gadkari Inaugurates  
गोवा

Nitin Gadkari Inaugurates | गोवा प्रदूषणापासून मुक्त करा!

Nitin Gadkari Inaugurates | मंत्री गडकरींचे आवाहन : पर्वरीतील सहापदरी उड्डाणपुलाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील ४९ टक्के रोजगार हा पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण होतो. त्यामुळे गोवा जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणापासून मुक्त झाले पाहिजे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता आणि रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवली पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी येथे केले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर उभारण्यात आलेल्या सहापदरी उड्डाणपुलाचे मंत्री गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, मंत्री सुदिन ढवळीकर, माविन गुदिन्हो, रमेश तवडकर, रोहन खंवटे,

आमदार नीलेश काब्राल, रुडॉल्फ फर्नांडिस, केदार नाईक यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. फीत कापून आणि डिजिटल पद्धतीने गडकरी यांनी उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. मंत्री गडकरी म्हणाले, या पुलामुळे आता अर्धा ते पाऊण तास वाया जाणार नाही.

गोव्यातील चांगले रस्ते गोव्याला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर नेतील. जिथे पायाभूत सुविधा उपलब्ध असतात तिथे भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होत असते आणि गरिबी कमी होते. त्याबरोबर महामार्गाच्या बाजूने वृक्षारोपण करताना अधिकाधिक कार्बन डायऑक्साइड कोणती झाडे शोषून घेतात, हे शोधून त्यांची लागवड करून मार्ग 'ग्रीन कॉरिडोअर' बनवावा.

ऑक्सिजन पार्क उभारा. त्याबरोबरच बायोफ्युएलचा वापर करावा म्हणजे प्रदूषण कमी होईल. पुलावर उभारली जाणारी गॅलरी लवकरात लवकर पूर्ण करावी. गोवा ही पर्यटनाची खाण आहे. राज्य सरकारने तंत्रज्ञानाचा उपयोग करून तिथे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले.

तीन नव्या प्रकल्पांना मंजुरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारने केलेल्या मागणीनुसार तीन नव्या प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये गोवा-कर्नाटक दरम्यान मोरे ते अनमोड रस्ता, मोले ते खांडेपार रस्ता आणि बोरी पूल यांचा समावेश आहे. त्यासाठी आवश्यक निधीही मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. हैदराबाद कॉरिडॉरवरील सोय येथील रस्त्यासंदर्भात स्थानिकांच्या मागण्यांचा विचार करत मंदिर वाचवण्यासाठी तिथे उड्डाणपूल मंजूर करण्यात आला आहे.

आजचा दिवस ऐतिहासिक : मुख्यमंत्री सावंत

गोव्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरल्याचे नमूद करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जुवारी पुलावरील ऑब्झर्व्हेटरी टॉवर्सचा पुन्हा शुभारंभ करण्यात आला. तसेच आयआयएम नागपूर आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यामध्ये भविष्यातील अपघात कमी करण्यासाठी अभ्यास करण्याचा सामंजस्य करार झाला. पर्वरी उड्डाणपूल वेळेत पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन झाले. हा पूल ११ सप्टेंबरला संध्याकाळी ४ वाजल्यापासून खुला होईल.

समतोल साधून विकास : श्रीपाद नाईक

गोवा विकासाची स्वप्ने मोठी आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे, ते पूर्ण करण्यात येईल, असे सांगून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, प्रकल्प सुरू असताना अनेक अडचणी आल्या असतानाही स्थानिक समस्या आणि विकास यांचा समतोल साधण्यात यश मिळाले. दोन दिवसांनंतर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होईल. तेव्हा पर्वरीतील वाहतूक कोंडी कमी होईल. या पुलाने राज्यातील रस्त्यांना नाही तर विकासाला वेग दिला आहे, असेही ते म्हणाले.

रस्ते अपघातांचा अभ्यास करणार

राज्यातील रस्ते अपघातांचा अभ्यास करून वाहतूक अनुरूप प्रारूप तयार करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यावेळी नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) यांच्याशी सामंजस्य करार केला. गोव्याच्या वतीने प्रधान मुख्य अभियंता संदीप प्रभू चिडणकर यांनी, तर नागपूर आयआयएमच्या वतीने डॉ. भीमाव मैत्री यांनी करारावर सह्या केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT