Nitin Gadkari: "मला लाज वाटते..." मुंबई-गोवा महामार्गाच्या विलंबाबद्दल नितीन गडकरींचा संताप, उद्घाटनालाही जाणार नाही

Nitin Gadkari Mumbai Goa Highway: पणजी येथील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariFile Photo
Published on
Updated on

Nitin Gadkari Mumbai Goa Highway

पणजी: पणजी येथील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गाचे काम इतके रखडल्यामुळे मला लाज वाटते आणि जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल, तेव्हा मी त्याच्या उद्घाटनालाही उपस्थित राहण्याची आपली इच्छा नसल्याचेही त्यांनी जाहीर केले.

नितीन गडकरी काय म्हणाले?

पणजीच्या उत्तरेकडील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी ५.१५ किलोमीटर लांबीच्या ६ पदरी उड्डाणपुलाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, "मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत दयनीय पद्धतीने रखडले असून कंत्राटदार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. माझ्या विभागाने भलेही अनेक जागतिक विक्रम केले असतील, पण एकाच वर्षात सर्वाधिक कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणे आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा विक्रम आता माझ्या विभागाच्या नावावर जमा व्हावा, अशी माझी इच्छा आहे." उद्घाटनासाठी चांगल्या मुहूर्ताची प्रतीक्षा करणे आता मी सोडून दिले आहे. विलंबाची मला लाज वाटत असल्याने मी या महामार्गाच्या उद्घाटनाला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Nitin Gadkari
Mumbai Goa Highway: गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; राज्य सरकारचा निर्णय

महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

विलंबाबद्दल तीव्र शब्दांत ताशेरे ओढले तरी, प्रकल्प लवकरच पूर्ण होईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. "कालच माझी एक बैठक झाली, त्यानुसार महामार्गाचे काम ९३ ते ९४ टक्के पूर्ण झाले आहे. ऑक्टोबरमध्ये मी मुंबई विमानतळावर उतरून थेट गोव्यापर्यंत कारने येईन आणि कामाच्या स्थितीची पाहणी करेन," असे गडकरींनी सांगितले.

जुना दोन पदरी मुंबई-गोवा महामार्ग चार पदरी करण्यासाठी २०११ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. प्रवासाचा वेळ १२ तासांवरून ६ तासांवर आणणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. मात्र, अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवरील कामे दीर्घकाळ रखडली. दरम्यान, काही भागांमधील रस्त्यांच्या नुकसानीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते.

पोरवोरीम उड्डाणपुलामुळे उत्तर गोव्यातील वाहतूक सुलभ होणार

बुधवारी गडकरींच्या हस्ते उद्घाटना झालेला हा उड्डाणपूल पणजीच्या उत्तरेकडील पोरवोरीम उपनगरातून जातो. या प्रकल्पाची घोषणा सात वर्षांपूर्वी झाली होती आणि प्रत्यक्षात जानेवारी २०२४ मध्ये कामाला सुरुवात झाली होती. अंदाजे ३६४.६८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच, या उड्डाणपुलामुळे राजधानी पणजी आणि कलंगुट, अणजूम यांसारख्या लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त नवीन मोपा विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होईल. हा नवीन उड्डाणपूल पणजी आणि मोपा विमानतळादरम्यान एक महत्त्वाचा दुवा ठरणार असून, मुंबई-गोवा महामार्ग तसेच मुंबई ते कन्याकुमारी या मोठ्या महामार्गाचा एक भाग असेल.

Nitin Gadkari
Mumbai Goa National Highway : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक परिस्थिती कायम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news