Stray Dog  
गोवा

Stray Dog | भटक्या कुत्र्याचा अधिकाऱ्यांच्या भोजनावर ताव

Stray Dog | बूथ लेव्हल ऑफिसर्ससाठी तयार करून ठेवलेल्या उघड्या चिकन ड्राय फ्रायच्या ट्रेमध्ये भटक्या कुत्रा खात असल्याचे आढळून आले.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मडगावच्या रवींद्र भवनात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेत अन्नसुरक्षेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बूथ लेव्हल ऑफिसर्ससाठी तयार करून ठेवलेल्या उघड्या चिकन ड्राय फ्रायच्या ट्रेमध्ये भटक्या कुत्रा खात असल्याचे आढळून आले.

या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रशासनाच्या भोजन व्यवस्थेतील हलगर्जीपणा, स्वच्छतेचा अभाव आणि अन्नसुरक्षेच्या नियमांची झालेली पायमल्ली यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मडगाव येथील रवींद्र भवनात २ आणि ३ सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत बीएलओ, ईएलसी आणि ईसीआयएनईटी या विषयांवरील प्रादेशिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी दक्षिण गोव्यासह राज्यातील विविध भागांतील बूथ लेव्हल ऑफिसर्स, निवडणूक यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या सर्वांसाठी कार्यक्रमस्थळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

परिषदेदरम्यान, भोजन व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणा समोर आला. तयार करण्यात आलेले चिकन ड्राय फ्राय उघड्या ट्रेमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचवेळी परिसरात मुक्तपणे फिरणारा भटक्या कुत्रा त्या ट्रेमध्ये तोंड घालून चिकन खात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. उपस्थित काहींजणांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर काही क्षणांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या घटनेनंतर अन्नसुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एवढ्या मोठ्या सरकारी कार्यक्रमात अन्न झाकून न ठेवणे आणि भोजनाच्या ठिकाणी भटक्या प्राण्यांचा प्रवेश होणे, ही बाब गंभीर मानली जात आहे.
दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावर प्रत्येकाने प्रशासनावर जोरदार टीका सुरू केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अन्नसुरक्षेचे नियम काटेकोरपणे लागू करावेत, अशी मागणी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर काही बीएलओ्रंनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT