Madgaon lift safety issue file photo
गोवा

Madgaon lift safety issue-मडगावातील दुर्घटनेनंतर 'लिफ्ट'चा प्रश्न ऐरणीवर

सरकारी कार्यालयांमध्ये गंभीर परिस्थिती; सुरक्षा तपासणी होत नसल्याच्या तक्रारी

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : मडगाव येथे घडलेल्या दुर्दैवी लिफ्ट दुर्घटनेत मार्सिया रोझा पाचेको (वय ७०) यांचा मृत्यू झाल्यानंतर दक्षिण गोव्यातील सरकारी कार्यालयांमधील लिफ्ट सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक सरकारी इमारतींतील लिफ्टची अवस्था अत्यंत खराब असून त्यांची नियमित देखभाल आणि सुरक्षा तपासणी होत नसल्याची तक्रार कर्मचारी आणि नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. मडगावमधील या दुर्घटनेत संबंधित महिला लिफ्ट मजल्यावर पूर्णपणे पोहोचण्यापूर्वीच दरवाजा उघडून आत जाण्याचा प्रयत्न करत असताना लिफ्ट अचानक खाली सरकली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, दक्षिण गोव्यातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये लिफ्ट बंद पडणे, अचानक थांबणे, दरवाजे व्यवस्थित न उघडणे किंवा लिफ्ट मजल्याशी समांतर न येणे अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. विशेषतः जुन्या प्रशासकीय इमारती, आरोग्य विभागाची

कार्यालये तसेच काही बिगर सरकारी संकुलांतील लिफ्टची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, अनेक ठिकाणी लिफ्टची वार्षिक तांत्रिक तपासणी वेळेवर केली जात नाही. काही लिफ्टमधील आपत्कालीन अलार्म प्रणालीदेखील कार्यरत नसल्याच्या तक्रारी आहेत.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना लिफ्टचा वापर करताना मोठा धोका निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांनी सरकारकडे सर्व सरकारी कार्यालयांतील लिफ्टची तातडीने सुरक्षा तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच धोकादायक स्थितीत असलेल्या लिफ्ट त्वरित बंद करून त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे. यासंदर्भात प्रशासनाने सर्व सरकारी इमारतींतील लिफ्टची स्थिती तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

गतवर्षी मडगाव येथील ओशिया कॉम्प्लेक्समध्येही लिफ्ट अचानक बंद पडल्याने दोन जण अडकून पडल्याची घटना घडली होती. मडगाव अमिशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांची सुरक्षित सुटका केली होती. विशेष म्हणजे संबंधित लिफ्ट वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या होत्या; मात्र व्यवस्थापनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. त्यामुळे ओशिया कॉम्प्लेक्समधील हा जुना प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे

कडक नियम लागू करण्याची गरज : विर्डीकर शिवसेनेचे गोवा शाखाप्रमुख राजू विडर्डीकर यांनी सांगितले की, सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले जाते. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिस्थितीदेखील चिंताजनक असून संपूर्ण संकुलाची दुर्दशा झाली आहे. येथे अनेक ज्येष्ठ नागरिक कामानिमित्त येतात; मात्र त्यांना लिफ्टचा सुरक्षित आणि सुरळीत वापर करता येत नाही. लिफ्ट देखभाल करणाऱ्या कंपन्यांवर अधिक कडक नियम लागू करण्याची गरज आहे. मडगावमधील ही दुर्घटना केवळ अपघात नसून सार्वजनिक सुरक्षेविषयीचा गंभीर इशारा आहे, असे विर्डीकर यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT