Goa Commercial LPG price hike impacts tourists | व्यावसायिक एलपीजी दरात वाढ, हॉटेल्सनी वाढवले दर; मध्यमवर्गीय पर्यटकांना फटका

Goa Commercial LPG price hike impacts tourists | व्यावसायिक एलपीजी दरात वाढ, हॉटेल्सनी वाढवले दर; मध्यमवर्गीय पर्यटकांना फटका
LPG price hike
LPG price hikefile photo
Published on
Updated on

Commercial LPG price hike impacts tourists

मध्यमवर्गीय पर्यटकांना फटका

गेल्या काही महिन्यांत व्यावसायिक एलपीजी दरात झालेल्या वाढीमुळे अनेक हॉटेल्सनी आपले दर वाढवले आहेत. चहा, नाश्ता, जेवण सरासरी २० टक्के महाग झाल्याने कुटुंब पर्यटनासाठी आलेल्या मध्यमवर्गीयांना त्याचा फटका बसला आहे. हा वर्ग छोटे छोटे खर्च खूप विचार करून करत असतो. बजेट कोलमडण्याची त्यांना भीती असते.

आरजी सुप्रिमोवरून मतभेद

राज्यात रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या खदखदीचा अखेर स्फोट झाला. पक्षाचे प्रमुख मनोज परब व आमदार वरिश बोरकर यांच्यातील मतभेद विकोपाला गेल्याने हा पक्ष दुभंगाच्या स्थितीत पोहचला आहे. त्यांच्यामध्येच गट पडले आहेत. त्यामुळे या पक्षाकडे मोठ्या आशेने पाहणाऱ्या गोमंतकीयांच्या पदरी निराशा पडली आहे. पहिल्यांदाच या पक्षाने विधानसभा निवडणूक लढवून एक आमदार निवडून आणला. तसेच या पक्षाला लोकांनी स्वीकारले. मात्र त्यांच्यात सुरू असलेल्या लाथाळ्यांमुळे लोकांचाही विश्वास उडाला आहे. हा वाद अंतर्गत असला तरी पक्षाचा सुप्रिमो कोण यावरून हा वाद आहे, असे दिसते. पक्षाचे प्रमुख म्हणून मनोज परब यांची हुकूमशाही तर आमदार वरिश बोरकर यांचा लोकांप्रती असलेला लढा यावरून त्यांच्यात बिनसले आहे, असे काही जण बोलतात.

विजय सरदेसाई अभ्यासू आमदार !

सध्या आरजीमधील वाढत्या वादावर मनोज परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर वक्तव्य केले. यावेळी वरिश बोरकर विधानसभेत फेल झाल्याच्या परब यांच्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारले असता, वरिशनी विजय सरदेसाई यांच्याप्रमाणे अभ्यास करून सादरीकरण करावे असे परब म्हणाले. सध्या विजय हेच सभागृहात' टॉपचे आमदार' आहेत, यात शंका नाही. या वक्तव्यामागे आपल्या आमदाराने अधिक अभ्यास करावा असा परब यांचा हेतू असला तरी वरिश बोरकर यांना आपल्याच पक्ष नेत्याने डावे समजल्याची बोचरी खंत राहील, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे.

ही दोस्ती तुटायची नाही !

राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत मतभेदांमुळे समोरासमोर उभे ठाकलेले मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. यावेळी मागील काही दिवसांत अनेक कारणांमुळे अनेक फुटीरवाद्यांमुळे आम्हा दोघांतील मैत्रीला धक्का पोहोचला हे खरे, मात्र आमची मैत्री तुटलेली नाही, असे मनोज परब यांनी जाहीर केले. आता जयने दिलेला मैत्रीचा हात वीरू धरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

समुद्रकिनाऱ्यांवर मंत्र्यांचा फेरफटका

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी समुद्रकिनाऱ्यांची पाहणी करताना तेथील समस्या तसेच अडचणी जाणून घेतल्या. या पाहणीबरोबरच त्यांनी साहसी जलक्रीडा प्रकाराची माहिती प्रत्यक्षात स्वतः त्याचा अनुभव घेत घेतली. या समुद्रकिनाऱ्यांवरील बेकायदा व्यवसाय, विदेश पर्यटकांना मसाजच्या नावाखाली लुबाडणारे काही परप्रांतीय, जलक्रीडा प्रकारावेळी समुद्रात पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटी यांच्यासंदर्भात त्यांनी चौकशी केली. त्यांची ही पाहणी पर्यटनमंत्री या नात्याने होती. पण सोबत खात्याचे कोणी अधिकारी नव्हते. चौकशी करताना त्यांनी टी शर्ट घातले होते व एखाद्या साध्या व्यक्तीप्रमाणे समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना ते मंत्री आहेत याची तेथे असलेल्या लोकांनाही माहीत नव्हते

गोव्यात अपमृत्यू वाढले

गेल्या काही महिन्यांत गोव्यात अपमृत्यूंचे वाढलेले प्रमाण गंभीर आहे. रस्ता अपघात, प्राण्यांचे हल्ले, आत्महत्या आगीच्या घटनांत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. डॉ. केतन माटीकर यांचा दुर्दैवी मृत्यू चटका लावणारा होता. परवा खैराट थोडण येथे इन्व्हर्टर मध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे एका महिलेचा बळी गेला. अनेक उमद्या तरुणांचेही अपघातात बळी गेले आहेत.

पहिले पाढे पंचावन्न

एखादी दुर्दैवी घटना घडते तेव्हा लोक टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. मात्र पब्लिक मेमरी इज शॉर्ट याची प्रचिती वारंवार येत असते. बर्च बाय रोमियो लेन अग्निकांडात अनेकांचे बळी गेले. या प्रकरणात हडफडेचे सरपंच रोशन रेडकर यांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे आलिशान घर, त्यांची मालमत्ता यावर अनेक कमेंट सोशल मीडियावर करण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांतच त्यांच्या रिक्त जागेवर त्यांची पत्नी बिनविरोध निवडून आली आहे

परदेसी परदेसी जाना नहीं?

पश्चिम बंगालात घुसखोरीचा मोठा मुद्दा भाजपने उपस्थित केला होता. तिथे भाजपची सत्ताही आली. मात्र भाजपचीच सत्ता असलेल्या गोव्यात गेली अनेक वर्षे परदेशी पर्यटक बेकायदा वास्तव्य करून आहेत. सध्या मांद्रेत असे सात पर्यटक आढळून आले आहेत. २०२५ पासून १६३ जणांची परत पाठवणी करण्यात आली. त्यात २२ बांगलादेशींचाही समावेश होता. राज्य सरकारने हे प्रकार गांभीर्याने घ्यायला हवेत

विजय खूश हुआ

प्रकरणापासून विजय सरदेसाई आरजी आणि मनोज परब यांच्यापासून थोडे लांबच राहतात. त्यांच्याबद्दल मतप्रदर्शन करतानाही खूप काळजी घेतात, मात्र रविवारी मनोज परब यांनी विजय सरदेसाई हेच टॉपचे आमदार असल्याचे सांगितल्यानंतर विजय नक्कीच खूश होतील. आज मैं उपर आसमां नीचे अशी अवस्था न झाली तरच नवल!

बोले तैसा चाले...

सध्या स्मार्ट मीटर व अन्य कारणांवरून वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांना लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र आता स्मार्ट भीटर टाळता येणार नाहीत. नवीकरणीय ऊर्जेवर ही ते चांगले काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल बचत करा असे आवाहन केल्यावर ढवळीकर यांनी ईव्ही वाहन वापरायला प्रारंभ केला. परवा त्यांनी गोवा मंगळूर प्रवास वंदे भारत ट्रेनने करून साधेपणाचा वस्तुपाठ घालून दिला. लोकांना नुसते उपदेश न करता त्यांनी स्वतः त्याची अंमलबजावणी सुरू केली. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे म्हटलेलेच आहे.

आरजीचा पायावर धोंडा ?

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाला १० टक्के मते मिळाली होती. त्यांचा एक आमदारही निवडून आला. २०२७ च्या निवडणुकीपूर्वी ३२ ए विरोधी आंदोलनाने त्यांनी चांगला टेम्पो वाढवला होता. यावेळी तर इनफ इज इनफ चळवळही त्यांच्यासाठी पूरक होती. असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात वाद उकरून काढल्याने त्यांनी स्वतःचा पायावर धोंडा मारून घेतला आहे, असे लोक म्हणत आहेत.

२०२७ मध्ये आरजी दिसणार का ?

आरजीतील वाद पाहता केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच मनोज परब आणि वीरश बोरकर यांच्यातील वाद विकोपाला गेला असून त्यांचे अनेक समर्थक वाद मिटवण्याऐवजी वाढवण्यात धन्यता मानत आहेत. अध्यक्षांनी देखील आमदारांवर हल्लाबोल केल्याने आता ते दोघे एकत्र येऊन पक्ष टिकवणार की इथेच एका पर्वाचा अंत होणार याबाबत काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत आरजी दिसणार का? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

विश्वजीत यांचा धडाका

विश्वजीत राणे यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक जण नाराज असले तरी ते धडाकेबाज मंत्री आहेत यात संशय नाही. मध्यंतरी त्यांनी भूरूपांतरणाचा धडाका लावला होता. त्यांच्यावर टीका झाल्यानंतरही सर्व काही कायदेशीर चौकटीत असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले होते. आता त्यांनी अनेक ठिकाणे नो डेव्हलपमेंट झोन जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. परवा त्यांनी सांताक्रूझ, कालापूर, जुने गोवे परिसर एनडीझोड केला. याबाबत तर ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत.

तृणमूल आणि आरजी

पश्चिम बंगालमध्ये अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा सफाया करत भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. निवडणुकीत हार जीत होत असते. पण राजकीय पक्षांनी प्रयत्न करणे सोडून चालत नाही. पराभवानंतर झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या आढावा बैठकीत काही जणांनी निराशेचा सूर लावला. ममता बॅनर्जी यांनी त्यांना स्पष्ट इशारा दिलाय की ज्यांना पक्ष सोडून जायचाय त्यांनी खुशाल जाये. आम्ही पुन्हा पक्ष बांधू, अशा कठीण काळात पक्षाबरोबर राहातात ते खरे कार्यकर्ते असे त्या म्हणाल्या. रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने यातून शिकण्यासारखे बरेच काही आहे.

भावनेचा भर आणि राजकारण

बर्चमधील अमिकांडात अनेकांचे बळी गेल्यानंतर तत्कालीन सरपंच रोशन रेडकर यांच्या मागे पोलिस हात धुवून लागले. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनवर शक्तिप्रदर्शन केले होते. कळंगुटमध्ये भाजपचा उमेदवार कसा निवडून येतो तो पाहतो असा इशाराही दिला होता. नंतर त्यांना अपात्र ठरवण्यात आले. पोटनिवडणुकीत त्यांचीच पत्नी त्या प्रभागातून बिनविरोध निवडून आली आहे. आता रेडकर म्हणतात पक्षविरोधी विधान भावनेच्या भरात केले होते. बहुदा पक्षालाही हा भर आता ओसरल्याचे लक्षात आले असावे. त्यामुळेच त्यांनी तिथे उमेदवार दिला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news