

पणजी : राज्यातील रेशन दुकानधारकांना धान्य वितरणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या फिंगर प्रिंट्स नोंदणी मशीन्स बीएसएनएल सर्व्हर यंत्रणा वारंवार नादुरुस्त होत असल्याने शिधापत्रिकाधारकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात दुकानदारांनी माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिधापत्रिकाधारकांना वेळेत धान्य वितरण होण्यात अडचणी येत आहेत.
शिधापत्रिकाधारकांना फिंगर प्रिंट्स नोंदणी केल्याशिवाय धान्य मिळत नाही. या दुकानांवर महिन्याच्या ५ तारखेच्या दरम्यान दुकान साठा वितरणासाठी आणला जातो व २० तारखेपर्यंत तो केला जातो. त्यानंतर हा धान्यसाठा दिला जात नाही. महिन्यातील जेमतेम १५ दिवसच उपलब्ध असले तरी त्यातील रविवार सुट्टीचा दिवस व किमान तीन वेळा फिंगर प्रिंट्स नोंदणी यंत्रणा सर्व्हर नादुरुस्त झाल्याने त्यापैकी जेमतेम १० दिवसच शिधापत्रिकांना धान्य उचलण्यासाठी उपलब्ध असतात. त्यातच काहीवेळा ही दुकानधारक धान्य वितरण दुकाने बंद ठेवतात किंवा उशिरा खुली करतात. त्यामुळे धान्य मिळवण्यासाठी शिधापत्रिकांची चांगलीच ओढाताण होते.
या धान्य वितरण दुकानधारकांना नागरी पुरवठा खात्याने फिंगर प्रिंट्स नोंदणीकरता बीएसएनएलची यंत्रणा उपलब्ध केली आहे. ही यंत्रणा महिन्यातून किमान ३ ते ४ वेळा तर त्यांचा सर्व्हर डाऊन असल्याने नादुरुस्त असते. यामध्ये दुकानधारकाचा व शिधापत्रिकाधारकांचा दोष नाही तर बीएसएनएलचा असतो. याची दखलही खात्याचे वरिष्ठ अधिकारी घेत नाहीत. काही शिधापत्रिकाधारक खात्याचे निरीक्षक किंवा सहायक संचालकांना भेटण्यास गेल्यास ते जागेवर नसतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.