पणजी : जमीन हडपप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडी असलेल्या संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला शनिवारी दिल्ली पोलिसांनी बदली वॉरंटवर दिल्लीला नेले. दिल्लीत त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासकामासाठी त्याला नेण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयातून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिली.
संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला क्राईम ब्रँचने जमीन हडपप्रकरणी अटक केल्यानंतर त्याने काही दिवसांतच पहारेकरी असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलला रात्री कोट्यवधीचे आमिष दाखवून पलायन केले होते. त्यानंतर सुमारे 15 दिवसांनी त्याला गोव्याबाहेर अटक केली.
त्याच्याविरुद्ध जुने गोवे पोलिसांनी कोठडीतील पलायनप्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले व त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. या प्रकरणात त्याला न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे.
त्याने जमीन हडपप्रकरणी क्राईम ब्रँचने नोंद केलेल्या प्रकरणातही जामीन अर्ज दाखल केला होता मात्र अजूनही त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्याच्याविरुद्ध गोव्यासह इतर राज्यांतही गुन्हे दाखल आहेत. त्याने म्हापसा येथील हजारो चौ.मी. जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून त्याचे भूखंड केले व त्याची विक्री केली. त्याला अटक केली तेव्हा त्याच्या व त्याच्या पत्नीच्या नावावर मोठी मालमत्ता नोंद आहे. त्यांचे विविध बँकांमध्ये खाती असून त्यात मोठी रक्कमही पोलिसांनी गोठवली आहे.
जमीन हडपप्रकरणी क्राईम ब्रँचकडून संशयित सुलेमान खान याची चौकशी झाल्याने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडी करण्यात आलेली आहे. सध्या तो कोलवाळ येथील कारागृहात होता.
काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी गोव्यात आले होते. मात्र, हा संशयित अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती मिळाल्यावर आणखी काही पोलिसांची कुमक दिल्लीहून मागवण्यात आली. त्यानुसार कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्याला घेऊन दिल्ली पोलिस सकाळी रवाना झाले.