

म्हापसा : म्हापसा मार्केट सब यार्डमध्ये उभारण्यात आलेला ‘बनाना रायपनिंग चेंबर’ प्रकल्प वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असून, वीज मिळताच तो तत्काळ कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती गोवा कृषी उत्पन्न पशुधन विपणन मंडळाचे अधिकारी गौतम बेणे यांनी दिली. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी ही माहिती दिली.
म्हापसा सब यार्ड हे रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या केळीमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. अन्न व औषध प्रशासनाने अनेकदा येथे छापे टाकून रासायनिक प्रक्रियेने पिकवलेली केळी जप्त करून नष्ट केली होती. रसायनांचा वापर करून केळी पिकवल्याने ती आरोग्यास घातक ठरतात. हा ठपका पुसून काढण्यासाठी आणि विक्रेत्यांना वैज्ञानिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने हा प्रकल्प राबवला आहे. गोवा कृषी उत्पन्न आणि पशुधन विपणन महामंडळाने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून म्हापसा सब यार्डमध्ये हा प्रकल्प उभारला आहे. नॅशनल हॉर्टीकल्चर मिशन या केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी 33टक्के निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.