कोरगाव : मकबूल माळगीमणी
भटवाडी-कोरगाव येथील राजीव काशिनाथ बर्वे गेल्या ५० वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करण्याची पारंपरिक कला जपत आहेत. ही कला त्यांना वडिलांकडून वारशाने मिळाली असून, आता त्यांच्या मुलाच्या रूपाने तिसरी पिढीही या कलेची जोपासना करीत आहे. दरवर्षी ते सुमारे २०० ते ३०० गणेशमूर्ती तयार करतात.
बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे प्रमाण वाढल्याने स्थानिक मूर्तिकारांवर मोठा परिणाम होत असल्याचे राजीव बर्वे यांनी सांगितले. सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली.
नुकतेच प्रदूषण नियंत्रण विभागाकडून मूर्तिकारांना एका अर्जामध्ये ८० टक्के माती आणि २० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर असल्याचे माहिती देण्यास सांगण्यात आल्याचे बर्वे यांनी सांगितले. मात्र, आम्ही पारंपरिक पद्धतीने १०० टक्के मातीचा वापर करून मूर्ती तयार करतो. मातीच्या मूर्तींमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करत नाही.
त्यामुळे अशा प्रकारचे अर्ज का भरून घेतले जातात, याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी बर्वे यांनी केली. राजीव बर्वे यांचा मुलगा सौरभ बर्वे हा या कलेची तिसरी पिढी आहे. युवकांनी मातीत हात घालून पारंपरिक कला शिकण्याची आवड निर्माण केली, तर या क्षेत्रातही चांगले करिअर करता येऊ शकते, असे सौरभ म्हणाले. Rajiv बर्वे यांचे मोठे बंधू आनंदराव बर्वे यांनीही युवकांनी पारंपरिक कलांकडे वळण्याची गरज व्यक्त केली.
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक कुशल कामगारांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे ही पारंपरिक कला हळूहळू कमी होत चालली आहे. भविष्यात गणेशमूर्ती तयार करणारे कारागीर उपलब्ध नसतील, तर मूर्ती मिळणेही कठीण होईल, अशी चिंता बर्वे कुटुंबीयांनी व्यक्त केली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणासाठीही चिंतेचा विषय आहेत.
विसर्जनानंतर त्या दीर्घकाळ पाण्यात तशाच राहतात. त्यामुळे ग्राहकांनीही पर्यावरणाचा विचार करून मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन राजीव बर्वे यांनी केले. पारंपरिक मातीच्या गणेशमूर्तींची कला जिवंत ठेवण्यासाठी सरकारने स्थानिक मूर्तिकारांना प्रोत्साहन, सुविधा आणि मार्गदर्शन द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.