

पणजी : पुढारी वृत्तसेवा
समविचारी पक्षांसाठी काँग्रेसने चर्चेची दारे बंद केलेली नाहीत. ती त्यांच्यासाठी अजूनही उघडी आहेत. गोवा फॉरवर्ड आणि 'आप'ने युती केली असली, तरी त्यांच्यासोबत चर्चा करण्यास हरकत नाही आणि अजूनही वेळ गेलेली नाही, असे काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपला पराभूत करण्यासाठी राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही ठाकरे यांनी नमूद केले.
गोवा फॉरवर्ड आणि आपने स्थापन केलेल्या 'गोवा फर्स्ट' या आघाडीसोबतही चर्चा करण्याची काँग्रेसची तयारी आहे. नेत्यांमध्ये सध्या जे काही आरोप-प्रत्यारोप होत आहेत, ते वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत. मात्र, भाजपविरोधात इतर सर्व पक्षांची युती व्हावी, असा निर्णय पक्षाने घेतला असल्याने त्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू राहतील, असेही माणिकराव ठाकरे म्हणाले.
काँग्रेसच्या 'गोवा राखण यात्रे'सह पक्षाच्या विविध कार्यक्रमांसाठी माणिकराव ठाकरे १८ सप्टेंबरला गोव्यात येणार आहेत. पक्षाची गोवा राखण यात्रा २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात यात्रेच्या तयारीबरोबरच आपण संघटनेच्या कामाचा आढावा घेणार असल्याची माहिती माणिकराव ठाकरे यांनी दिली.
'आप' आणि 'गोवा फॉरवर्ड' एकत्र आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने आप, गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस यांच्यातील दरी वाढत आहे.
आप-गोवा फॉरवर्डच्या तिसऱ्या आघाडीमुळे भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली असली, तरी चर्चेची दारे खुली असल्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगून आशेचा दिवा लुकलुकत ठेवला आहे.