पणजी : रिव्होल्युशनरी
गोवन्स पार्टीमधील अंतर्गत मतभेद आणि अध्यक्षपदावरील अनिश्चिततेमुळे पक्षाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर येत्या एका महिन्यात नवीन अध्यक्षाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पक्षाचे खजिनदार अजय खोलकर यांनी दिली. अजय खोलकर म्हणाले की, माजी अध्यक्ष मनोज परब यांनी राजीनामा देण्यापूर्वीच आमच्याशी चर्चा करून आपला निर्णय कळविला होता.
तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता आणि त्याचा आम्ही आदर करतो. त्यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच आमदार वीरेश बोरकर यांना पक्षाध्यक्ष करण्याबाबतही तेव्हा चर्चा सुरू झाली होती. मात्र वीरेश यांनी कोणत्याही चर्चेत किंवा संवादात सहभाग दाखवला नाही. तब्बल ७० दिवसांनंतर ते पक्ष कार्यालयात आले, मात्र तेव्हाही याबाबत चर्चा झाली नाही.
मनोज यांच्यानंतर वरिश हे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांना अध्यक्ष व्हायचे असल्यास त्याचे स्वागतच आहे. मात्र त्यासाठी त्यांनी पुढे येऊन स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद साधणे आवश्यक आहे. त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही धडपडत आहोत.
परंतु ते सातत्याने स्पष्ट चर्चा टाळत आहेत, असे खोलकर यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या (सीईसी) बैठकीत नवीन अध्यक्ष निवड आणि पक्षाच्या अजय खोलकर भविष्यातील धोरणावर चर्चा होणार होती. मात्र बैठकीदरम्यान आमदार बोरकर यांनी अचानक विरोधाची भूमिका घेत विविध कागदपत्रे आणि अंतर्गत माहितीची मागणी केली.
सर्व माहिती मिळाल्याशिवाय कोणत्याही विषयावर चर्चा करणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे बैठक तहकूब करावी लागली आणि मुख्य विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. बोरकर यांना यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्याविरोधातील शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू आहे.
अशा परिस्थितीत त्यांना पक्षाची अंतर्गत कागदपत्रे द्यावीत की नाही, याबाबत कायदेशीर आणि संघटनात्मक स्तरावर विचार सुरू आहे, असेही खोलकर म्हणाले. पक्षाची पुढील सर्वसाधारण सभा जानेवारी २०२७ मध्ये होणार असली, तरी त्याआधीच प्रभारी अध्यक्ष नेमायचा की नवीन अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक घ्यायची हा निर्णय घेतला जाईल.
सांतआंद्रे आरजीपीचा बालेकिल्ला !
आगामी निवडणुकांबाबत बोलताना खोलकर म्हणाले की, प्रत्येक पक्षाचे ठरलेले पारंपरिक आणि मजबूत मतदारसंघ असतात. सांतआंद्रे हा आरजीपीचा बालेकिल्ला आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून उमेदवारीसाठी पहिली पसंती आमदार वरिश बोरकर यांनाच दिली जाईल. मात्र, त्यासाठी त्यांनी पक्ष नेतृत्वाशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे खोलकर यांनी सांगितले.
मला अध्यक्षपदात रस नाही, मात्र... खोलकर
सध्या माझ्याविरुद्ध अनेक गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत मला अध्यक्षपद हवे असल्याचे बोलले जात आहे. मात्र तसे काही नाही. अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर कुणीतरी समोर येऊन बाजू मांडणे गरजेचे असल्याने मी बाजू मांडत आहे. मला वैयक्तिक विचारले तर अध्यक्षपदांमध्ये रस नाही मात्र, पक्षाने जर जबाबदारी सोपवली तर त्याचा विचार केला जाईल, असे मत अजय खोलकर यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केले.