

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आरजी पक्षातील अंतर्गत मतभेद आता अधिक तीव्र होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी सोमवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून आमदार वरिश बोरकर यांच्याशी चर्चा करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोरकर यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण बाहेर असल्याचे सांगतानाच आमदार बोरकर यांनी समाज माध्यमांवर टाकलेल्या भावनिक पोस्टमुळे पुढे नेमके काय होणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आरजीचे अध्यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी ३ ते ७ या वेळेत होणाऱ्या या बैठकीत आमदार बोरकर यांच्यासह त्यांचे तीन पदाधिकारी आणि पक्षाचे अध्यक्ष मनोज परब, विश्वेश नाईक यांच्यात सविस्तर चर्चा होऊन तडजोड होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
मात्र, आमदार बोरकर यांनी केंद्रीय समितीचे हे आवाहन फेटाळून लावत बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वीरेश बोरकर यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केल्याने सध्याच्या परिस्थितीला वेगळेच राजकीय आणि भावनिक परिमाण मिळाले आहेत. ते म्हणाले की, मी सत्तेसाठी नव्हे, तर गोव्यासाठी राजकारणात उतरलो.
अण्णा हजारे आंदोलनामुळे विद्यार्थी जीवनापासून अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा मिळाल्याचे नमूद करत त्यांनी, गोव्यासाठी बोलताना शत्रू निर्माण होत असतील, तर ते मी नम्रतेने स्वीकारतो, असे म्हटले आहे. तसेच, व्यक्तींवरील द्वेष गोव्यावरील प्रेमापेक्षा मोठा होऊ देऊ नका. वीरेश बोरकरांना विसरा, फक्त गोव्याचा विचार करा, असे आवाहन करत त्यांनी गोव्याची संस्कृती, शेती, नद्या आणि भविष्यासाठीचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. एक दिवस इतिहास प्रत्येकाला विचारेल की, गोव्याला तुमची गरज होती, तेव्हा तुम्ही कुठे होता?' या भावनिक प्रश्नाने बोरकर यांच्या पोस्टची सांगता झाली. आरजी पक्षातील वाढत्या मतभेदांमुळे आगामी काळात पक्षाच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजूनही मौन का?
आरजीमधील वाद हा आता केवळ राजकीय मुद्दा राहिला नसून प्रत्येक मतदाराच्या आणि पक्षाला मानणाऱ्या समर्थकांच्या, हितचिंतकांच्या घरातला विषय बनला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी समोरासमोर येत, काय ते सोक्षमोक्ष लावून वाद मिटविला पाहिजे, अशी मागणी होत असताना अद्याप वीरेश बोरकर आपले मौन सोडून त्यांची बाजू का मांडत नाहीत, असे सवाल आता उपस्थित केला जात आहे.