प्रातिनिधिक फोटो. File Photo
गोवा

Goa Mopa Airport | तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे मोपा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

२२९ प्रवासी आणि क्रू सदस्य सुखरूप; प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

Manohar International Airport IndiGo Emergency Landing

पणजी : दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वैमानिकांनी विमान पुन्हा गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे वळवून मंगळवारी (दि.१) सकाळी सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. विमानातील २२९ प्रवासी आणि क्रू सदस्य सुखरूप असून, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

इंडिगोचे विमान सकाळी ९.१६ वाजता उत्तर गोव्यातून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. त्यानंतर निर्धारित कार्यपद्धतीनुसार संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि विमान मोपा विमानतळाकडे परत वळविण्याचा निर्णय घेण्यात आला.

विमानाने सकाळी ९.५१ वाजता मोपा विमानतळाच्या धावपट्टीवर सुरक्षित लँडिंग केले. त्यानंतर विमान स्टँडकडे नेण्यात आले. सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षितपणे विमानातून बाहेर पडले. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.

दरम्यान, विमानतळावर सकाळी ९.३० वाजता जाहीर करण्यात आलेली पूर्ण आपत्कालीन स्थिती १०.०३ वाजता मागे घेण्यात आली. प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी इंडिगोकडून दिल्लीला पोहोचविण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

इंडिगोने अधिकृत निवेदनातून विमानात उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड आढळल्याची पुष्टी केली. संबंधित सुरक्षा प्रक्रियांचे पालन करून विमान मोपा विमानतळावर परत आणण्यात आले आणि सुरक्षितपणे उतरविण्यात आले, असे कंपनीने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT