

मयुरेश वाटवे
भाजप-मगो विरुद्ध काँग्रेसप्रणीत आघाडी यांच्यात आगामी विधानसभा निवडणूक होईल, अशी अटकळ अगदी कालपर्यंत बांधली जात होती. मात्र, गोवा फॉरवर्ड पक्षाने वेगळा मार्ग पत्करला आहे. ‘आप’ने युतीची इच्छा प्रदर्शित केली असली तरी शेवटच्या क्षणी त्यांचे मत बदलू शकते. आरजीची अवस्था सध्या तरी दयनीय आहे. अशावेळी तिसऱ्या आघाडीचा बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे.
गोव्याची २०२७ ची विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे. सरकारविरोधी आंदोलनात विरोधी पक्ष दिसत नसेल तर तोही सरकारला सामील आहे, असाच अर्थ आता लोक काढू लागले आहेत. गोव्यातील लोकांची इच्छा होती की, विरोधकांनी एकत्र यावे. मात्र, कुणीच मागे हटण्याच्या स्थितीत नाही. अशावेळी भाजपविरोधी मते आम्हालाच मिळतील, या भ्रमात काँग्रेसने राहू नये. ज्या मतदारसंघात जो उमेदवार ‘विनेबल’ वाटेल त्याच्या मागे लोक राहू शकतात. राजकीय पक्ष लोकांचे ऐकत नसतील तर लोक स्वत:च त्यांना हवे ते करून दाखवतील. आता पक्षाकडे पाहून मतदान करण्याचे दिवस गेले आहेत, असेच दिसते. भाजपवर नाराज असलेला मतदार सध्या काँग्रेसवरही खूश नाही. अशावेळी सक्षम तिसरा पर्याय दिसला तर लोक त्याच्या मागे जाऊ शकतात. तामिळनाडूमध्ये विजय जोसेफ यांनी ते करून दाखवले आहे. अर्थात, भाजप, काँग्रेस वगळून एखाद्या पक्षाला बहुमत मिळेल, असे म्हणणे सध्या तरी अतिशयोक्ती होईल.
पूर्वी मतदाराची पक्षाशी असलेली नाळ घट्ट होती. पक्ष म्हणजे विचार, विचार म्हणजे निष्ठा, असे एक साधे गणित होते. आता ते गणित तितके सरळ राहिलेले नाही. नेते निष्ठावान राहिलेले नाहीत. पक्षनिष्ठा आणि पक्षप्रेम यांच्या सीमा धूसर होत आहेत. बिहारमधील बांकीपूरची पोटनिवडणूक याचे ठळक उदाहरण आहे. भाजपचा अनेक दशकांचा गड मानली जाणारी ही जागा ‘जनसुराज’चे प्रशांत किशोर यांनी जिंकली. त्यांनी भाजपचा तब्बल तीन दशकांचा प्रभाव मोडून काढला. प्रशांत किशोर अनेक वर्षे त्या परिसरात आणि बिहारच्या राजकारणात सक्रियपणे काम करत होते. निवडणुकीत त्या कामाचा फायदा त्यांना मिळाला. गोव्यातही अशाच प्रकारचा प्रयोग घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपविरोधी मत म्हणजे आपोआप काँग्रेसचेच, हा सर्वात मोठा गैरसमज ठरू शकतो. त्याचप्रमाणे भाजपलाही आपला पारंपरिक मतदार प्रत्येक मतदारसंघात पक्षाच्या चिन्हामागे डोळे झाकून उभा राहील, असे गृहीत धरता येणार नाही.
पक्षाबाहेरील लोक येऊन शिरजोर झालेत आणि आपल्याला पक्षात काही किंमत राहिलेली नाही ही भावना कार्यकर्त्यांत प्रबळ होत आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेससाठीही परिस्थिती कठीण आहे. आपल्या संघटनात्मक निर्णयक्षमतेचा अभाव आणि अंतर्गत मतभेद यांचा परिणाम केवळ जागावाटपावर होईल, असे पक्षाने समजू नये. त्याचा परिणाम मतदाराच्या विश्वासावरही होऊ शकतो. म्हणूनच तिसरी आघाडी निर्माण झाली तर तिचे महत्त्व केवळ ती काँग्रेस आणि भाजपची मते किती फोडते, यापुरते मर्यादित राहणार नाही. एखाद्या मतदारसंघात ती स्वतःचा मजबूत उमेदवार उभा करू शकली, त्याच्याकडे संघटन, वैयक्तिक जनाधार आणि जिंकण्याची क्षमता असेल तर मतदार त्या उमेदवाराला पर्याय म्हणून स्वीकारू शकतो; पण केवळ अनेक छोट्या पक्षांची बेरीज म्हणजे तिसरी शक्ती होत नाही. मतदाराला ती शक्ती आहे, असे वाटले पाहिजे.
गोवा फॉरवर्डने काँग्रेसशी असलेले संबंध जवळपास संपुष्टात आणले आहेत. पक्षविस्तार करायचा तर येती विधानसभा निवडणूक हीच संधी आहे, असे पक्षाला वाटते आहे. त्यांनी त्या दृष्टीने तयारीही केली आहे. मगो पक्षही त्याच दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसते. गोव्याच्या मतदाराला कोणत्याही पक्षाचा हिशेब चुकता करायचा नाही. त्याला आपला आमदार निवडायचा आहे. त्याला आपल्या मतदारसंघासाठी कोण उभा राहू शकतो, कोण सरकारवर दबाव आणू शकतो, कोण काम करून घेऊ शकतो आणि निवडणुकीनंतरही उपलब्ध राहू शकतो, हे अधिक महत्त्वाचे वाटू शकते. पक्षाचे चिन्ह महत्त्वाचे राहीलच; पण तो निर्णायक घटक ठरेल, असे नाही. भाजप, काँग्रेस, मगो या पारंपरिक पक्षांची यामुळे २०२७ च्या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. तिसरी आघाडी स्वतः शक्ती म्हणून उभी राहते की, केवळ भाजप-काँग्रेसचे गणित बिघडवणारी ठरते, हे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होईल; पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होत आहे, गोव्यात पक्षनिष्ठेच्या भिंतींना तडे गेले आहेत. आता मतदार पक्षाचा नसून स्वतःच्या मताचा मालक होत चालला आहे आणि हीच २०२७ च्या निवडणुकीची सर्वात मोठी गोष्ट ठरू शकते.