पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारताचे ऊर्जा क्षेत्र आकांक्षांच्या केंद्रस्थानी आहे. या क्षेत्रात ५०० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या संधी आहेत. त्यामुळे मेक इन इंडिया, इनोव्हेट इन इंडिया, स्कील विथ इंडिया, इन्व्हेस्ट इन इंडिया हे उपक्रम राबवले जात आहेत. ऊर्जा क्षेत्रासाठी आज भारत अमाप मोठ्या संधींची भूमी बनली असून भारत आता ऊर्जा सुरक्षेच्या पलीकडे जाऊन ऊर्जा स्वातंत्र्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
बेतुल येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या इंडिया एनर्जी वीक २०२६ चे उद्घाटन मोदी यांनी आभासी पद्धतीने नवी दिल्लीतून केले. यावेळी बेतुल येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सावंत, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी, संयुक्त अरब अमिरातींचे उद्योग व प्रगत तंत्रज्ञान मंत्री सुलतान अहमद अल जाबेर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, संवाद आणि कृतीसाठी भारत ऊर्जा सप्ताह अल्पावधीतच एक जागतिक व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे.
आज भारत ऊर्जा क्षेत्रासाठी मोठ्या संधींची भूमी असल्याचे सांगितले. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. याचा अर्थ देशात ऊर्जा उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी भारत उत्कृष्ट संधीदेखील पुरवत आहे. भारत जगातील पेट्रोलियम उत्पादनांच्या अव्वल पाच निर्यातदारांपैकी एक असून निर्यात व्याप्ती १५० हून अधिक देशांपर्यंत विस्तारली आहे.
भारत आणि युरोपीय संघ यांच्यात कालच एका महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी झाली आहे. जगभरातील लोक याची चर्चा सर्व कराराची जननी म्हणून करत आहेत. हा करार भारताच्या १४० कोटी लोकांसाठी आणि युरोपीय राष्ट्रांमधील लाखो लोकांसाठी प्रचंड संधी घेऊन आला आहे.
तेल शुद्धीकरण अर्थात रिफायनिंग क्षमतेत भारत सध्या जगात दुसऱ्या क्रमांकावर असून लवकरच पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताची सध्याची तेल शुद्धीकरण क्षमता दरवर्षी २६० दशलक्ष मेट्रिक टन असून ती ३०० दशलक्ष मेट्रिक टन पेक्षा जास्त करण्यासाठी सातत्यापूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. आजचा भारत रिफॉर्म एक्सप्रेसवर स्वार झाला असून प्रत्येक क्षेत्रात वेगाने सुधारणा होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऊर्जा संक्रमणासाठी गुंतवणुकीचा आधार हवा :
पुरी ऊर्जा सुरक्षा, परवडणारे दर आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी ऊर्जा संक्रमणाला सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा आधार आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केले. जागतिक ऊर्जा व्यवस्थेतील अभूतपूर्व संक्रमण आणि अस्थिरतेच्या काळात धोरणकर्ते, उत्पादक, ग्राहक, तंत्रज्ञान पुरवठादार आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणण्याचे कार्य ही परिषद करीत आहे, असेही पुरी म्हणाले.
जागतिक ऊर्जा क्षेत्र परिवर्तनाच्या टप्यात :
सुलतान जाबेर सुलतान अहमद अल जाबेर बाजारपेठा, म्हणाले की, जागतिक ऊर्जा मागणी मोठ्या प्रमाणावर परिवर्तनाच्या टप्प्यात प्रवेश करत असून, हे परिवर्तन उदयोन्मुख डिजिटलायझेशन आणि विविध ऊर्जा प्रणालींच्या एकत्रीकरणामुळे वेग घेत आहे. आगामी काळात जागतिक ऊर्जा मागणीचा निर्णायक चालक भारत ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.