म्हापसा : कळंगुट-बागा परिसरात अतिक्रमण करून उभारलेली रॉक तसेच इतर बांधकामांवर कारवाई करण्यास पर्यटन खात्याने सुरू केले आहे. मंगळवारी 17 बांधकामे पोलिस बंदोबस्तात मोडून टाकण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू आहे, अशी माहिती पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मिनिनो फर्नाडिस यांच्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने कळंगुट, बागा परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कळंगुट - कांदोळी समुद्रकिनारा परिसरात ७० जणांनी अतिक्रमण केल्याची माहिती याच्यापूर्वी पर्यटन संचालकांनी उच्च न्यायालयाला दिली होती. कारवाई करण्याविषयी त्यांना नोटिसासुद्धा जारी केल्या होत्या.
उपगृह तंत्रज्ञानाच्या मदतीने कांदोळी कळंगुट परिसरातील १२ भागांमधील ३ भागांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. इतर भागांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर पुढील कारवाई होणार आहे. दरम्यान, बेकायदा बांधकामांवर कारवाई पूर्ण करून त्याचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर ही कारवाई हाती घेण्यात आली.
मिनिनो फर्नाडिस यांची याचिका
सर्वेक्षण संचालनालयाने ५ सप्टेंबर २०२२ या दिवशी कांदोळी आणि कळंगुट समुद्रकिनारा परिसरात सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षण केल्यानंतरसुद्धा समुद्रकिनारा परिसर तसेच सरकारी जाग्यांवर अतिक्रमण सुरू आहे. या अतिक्रमणावर कसलीच कारवाई होत नाही, असा दावा करीत मिनिनो फर्नाडिस यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या जनहित याचिकेवर सुनावणी होऊन कारवाईचा आदेश जारी केला आहे.