

धाराशिव : काही देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईची अफवा पसरल्याने जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची अनावश्यक गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
या पार्श्वभूमीवर 5 मे रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. यामध्ये एचपीसीएल, बीपीसीएल व आयओसीएल कंपन्यांचे डेपो पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, मागणीनुसार इंधनाचा पुरवठा नियमितपणे होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात पेट्रोल व डिझेल विक्रीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले. ही वाढ नागरिकांनी अफवांमुळे अतिरिक्त साठा केल्याने झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे सर्व पेट्रोल पंप चालकांना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले.
... तर पंप चालकांवर कारवाई
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पेट्रोल पंपांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधितांवर पेट्रोलियम अधिनियम 2002 तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.