वास्को : 'आयसीजीएस अजित' या गस्ती जहाजाच्या कार्यान्वयनप्रसंगी प्रधान एकात्मिक वित्तीय सल्लागार डॉ. सिरीश चौधरी. सोबत अन्य अधिकारी. (छाया : शेखर कळंगुटकर) 
गोवा

ICGS Ajeet -'आयसीजीएस अजित' गस्ती नौकेचे लोकार्पण

ICGS Ajeet patrol vessel- भारतीय तटरक्षक दलाचा पुढाकार; किनारी सुरक्षेसह महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणार

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी :

भारतीय तटरक्षक दलाने वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये 'आयसीजीएस अजित' या नव्या पिढीतील वेगवान गस्ती जहाजाचे कार्यान्वयन करून महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारतीय तटरक्षक दलाचे प्रधान एकात्मिक वित्तीय सल्लागार डॉ. सिरीश चौधरी (आयडीएएस) यांच्या हस्ते या जहाजाचे औपचारिकरीत्या सेवेत लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमहानिरीक्षक मनोज भाटिया (टीएम), तटरक्षक दलाच्या गोव्यातील जिल्हा मुख्यालय क्रमांक ११ चे कमांडर, केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गोवा शिपयार्डमध्येच या जहाजाची रचना आणि बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे 'आयसीजीएस अजित' हे स्वदेशी जहाजबांधणी क्षेत्रातील आणखी एक महत्त्वपूर्ण यश ठरले आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांतर्गत केंद्र सरकारने मांडलेल्या स्वावलंबनाच्या दृष्टिकोनाला या जहाजामुळे बळ मिळाले आहे. देशांतर्गत जहाजबांधणी क्षमता आणि भारताच्या सागरी क्षेत्रातील वाढती तांत्रिक व औद्योगिक ताकदही या यशातून अधोरेखित होते.

'आयसीजीएस अजित' हे जहाज सागरी कायद्यांची अंमलबजावणी, शोध व बचावकार्य, किनारी सुरक्षा, सागरी पर्यावरणाचे संरक्षण आणि संकटात सापडलेल्या खलाशांना मदत करणे यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाला साहाय्य करणार आहे.

कमांडंट (जेजी) मनीष तालन यांच्या नेतृत्वाखाली हे जहाज आणि त्यावरील कर्मचारी भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. व्यावसायिकता, दक्षता आणि राष्ट्रसेवेची गौरवशाली परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी या पथकावर असेल. 'आयसीजीएस अजित'चे कार्यान्वयन हे भारतीय तटरक्षक दलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

सागरी सुरक्षा व संरक्षण अधिक सक्षम करण्याबरोबरच सागरी पर्यावरणाचे संवर्धन आणि देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्याप्रती असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या वचनबद्धतेलाही या नव्या जहाजामुळे बळ मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT