Goa FDA action coastal area | नियमांचे उल्लंघन : चार अन्न आस्थापने बंद

किनारी भागात एफडीएची कारवाई; तिघांना प्रत्येकी १० हजार दंड
Food Adulteration FDA Action
Food Adulteration FDA Action Pudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी किनारी भागातील हणजूण, हडफडे व कळंगुट येथील चार अन्न आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करत त्यांचे कामकाज बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तीन खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अस्वच्छतेबाबत प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच ६० किलो खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले.

एफडीएच्या सुरू असलेल्या तपासणी मोहिमेंतर्गत या तीन भागांतील १३ रेस्टॉरंट आणि काजू विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनिवार्य लेबल माहिती नसलेली आणि चुकीचे लेबल लावलेली उत्पादने विकल्याचा आरोप असलेल्या एका काजू विक्रेत्याचा समावेश आहे. तसेच स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन रेस्टॉरंटनाही कामकाज थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

६० किलो खाद्यपदार्थ नष्ट

तपासणीदरम्यान सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य आढळलेल्या खाद्यपदार्थांवरही एफडीएने कारवाई केली. यामध्ये अतिप्रमाणात रंग वापरलेले ३० किलो तंदुरी पदार्थ आणि चिकन लॉलीपॉप, २० किलो बिर्याणी, तसेच १० किलो पेस्ट्री पदार्थांचा समावेश होता. एकूण ६० किलो खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले. खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा अतिवापर तसेच स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एफडीएने आस्थापनांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे.

तीन विक्रेत्यांना प्रत्येकी १० हजारांचा दंड

अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ च्या कलम ६९ अंतर्गत तीन विक्रेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि उत्पादनांवरील आवश्यक माहिती याबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी पथकाने ही मोहीम राबवली. अन्नपदार्थांची विक्री करताना आवश्यक नियमांचे पालन केले जाते की नाही, यावर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर पुढेही तपासणी आणि कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news