Goa First Alliance -'गोवा फर्स्ट अलायन्स'चा पर्याय अजूनही खुला

Goa First Alliance Kejriwal Guarantees- वाल्मीकी नाईक; गोमंतकीयांसाठी सहा 'केजरीवाल गॅरंटी' जाहीर
 वाल्मीकी नाईक
वाल्मीकी नाईक
Published on: 
Updated on: 

पणजी : "गोवा फर्स्टने सुरुवातीला जाहीर केलेल्या आघाडीत आम आदमी पक्षासोबत गोवा फॉरवर्ड पार्टी होती. आम्ही इतर पक्षांशी तसेच अपक्ष नेत्यांशीही चर्चा करीत आहोत. त्यामुळे ही आघाडी अस्तित्वात असून, तिचा मंच अजूनही खुला आहे. गोवा फॉरवर्ड पार्टी आघाडीसोबत आहे की नाही, हे त्या पक्षाचे नेतेच सांगू शकतील. भाजप आणि काँग्रेसच्या संयुक्त कारभारात बदल घडवू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी 'गोवा फर्स्ट अलायन्स'चा मंच खुला आहे," असे आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मीकी नाईक यांनी स्पष्ट केले.

आपतर्फे शुक्रवारी वाल्मीकी नाईक गोमंतकीयांसाठी सहा 'केजरीवाल गॅरंटी' जाहीर केल्या. त्यावेळी नाईक यांनी गोवा फर्स्ट आघाडीबाबत भाष्य करणे टाळले होते. यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी आघाडीसंदर्भातील होर्डिंग्ज आपणच काढल्याचे मान्य केले आहे. त्यांची भूमिका बदलली असेल, तर त्यांनी ते स्पष्टपणे सांगावे. काँग्रेस आणि भाजप यांच्यातील कथित छुप्या युतीबाबत आम आदमी पक्ष आपली भूमिका स्पष्टपणे मांडत आहे, असेही नाईक म्हणाले.

"आमच्या बाजूने शंभर टक्के स्पष्टता आहे. भविष्यात काय होईल, हे सांगता येणार नाही. 'ग्रँड गोवा अलायन्स' सध्या कुठे आहे? अद्याप अशी कोणतीही आघाडी अस्तित्वात आलेली नाही. सध्यातरी 'गोवा फर्स्ट अलायन्स' हाच अधिकृतपणे जाहीर झालेला मंच आहे आणि आम्ही त्याअंतर्गत कामाला सुरुवात केली आहे," असे नाईक यांनी सांगितले.

गॅरंटीमध्ये कॅसिनोंबाबत काय आहे?

आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या केजरीवाल गॅरंटीमध्ये कॅसिनोंबाबत स्पष्ट भूमिका का मांडलेली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाईक म्हणाले की, कॅसिनोंचा प्रश्न हा संपूर्ण राज्याशी संबंधित आहे. मात्र, कॅसिनोंमुळे गोमंतकीयांना किती त्रास सहन करावा लागतो, याची जाणीव अद्याप राज्यातील सर्व नागरिकांना झालेली नाही. कॅसिनोंचा त्रास केवळ पणजीतील नागरिकांनाच होतो, असा अनेकांचा समज आहे.

कॅसिनो लॉबी ही बिल्डर लॉबीइतकीच धोकादायक आहे. या प्रश्नाबाबत जनजागृती करून त्याचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचविणार आहोत. राज्यातून कॅसिनो हटविण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व प्रयत्नांना आम आद‌मी पक्ष निश्चितच पाठिंबा देईल, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news