Selaulim Dam 
गोवा

Selaulim Dam | साळावलीत वाढले पाणी; ऐतिहासिक कुर्डी पुन्हा अदृश

Selaulim Dam | बेकायदेशीर मासेमारी सुरू; ऐतिहासिक वास्तूंची पडझड, वारसा संवर्धनाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साळावली धरणाच्या जलाशयातील पाणीपातळी झपाट्याने वाढत असून इतिहास, संस्कृती, श्रद्धा आणि विस्थापनाच्या वेदनांचे प्रतीक असलेले ऐतिहासिक कुर्डी गाव पुन्हा एकदा पाण्याखाली जाऊ लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जलाशयातील पाणी सातत्याने वाढत असल्याने प्रसिद्ध श्री सोमेश्वर मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे जलमय झाला आहे. त्यामुळे मंदिराशी संपर्क तुटला असून पुढील सहा ते सात महिने संपूर्ण परिसर जलाशयाखाली राहणार आहे.

साळावली धरण उभारणीवेळी कुर्डीसह सुमारे २४ गावे जलाशयात बुडाली होती. हजारो ग्रामस्थांना आपली घरे, शेती, देवस्थाने आणि पूर्वजांची भूमी सोडून स्थलांतर करावे लागले. शासनाने त्यांचे पुनर्वसन वालंकिनी आणि वाडे येथे केले असले, तरी मूळ गावाशी असलेले भावनिक नाते आजही कायम आहे. पावसाळ्यानंतर पाणी ओसरताच हजारो भाविक श्री सोमेश्वर मंदिरात महोत्सवासाठी येतात.

हा सोहळा धार्मिकतेबरोबरच आपल्या मूळ गावाशी पुन्हा नाते जोडणारा भावनिक क्षण मानला जातो. पावसाळा सुरू होताच प्रथम मंदिराचा रस्ता पाण्याखाली जातो. त्यानंतर पोर्तुगीजकालीन दगडी रस्ते, कालवे, पूल, विहिरी, घरांचे अवशेष आणि इतर ऐतिहासिक संरचना जलाशयात विलीन होतात. पाणी ओसरल्यानंतर देशभरातील पर्यटक येथे भेट देतात. विशेष म्हणजे, गेली सुमारे ४२ वर्षे दरवर्षी सहा-सात महिने पाण्याखाली राहूनही या दगडी रस्त्यांसह अनेक संरचना टिकून आहेत.

मात्र, त्यांच्या अभियांत्रिकी तपासणी किंवा मजबुतीच्या परीक्षणाबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने संवर्धनाची गरज व्यक्त होत आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी या परिसरात फिरण्यासाठी आलेल्या युवकांची जीप उलटून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर सुरक्षा उपाययोजनांची मागणी झाली होती.

मात्र, आजही धोकादायक रस्त्यांवरून वाहने नेणे, पाण्याखाली गेलेल्या भागात छायाचित्रण करणे आणि जीव धोक्यात घालून फिरणे सुरूच असल्याचे दिसून येत आहे. कुर्डी गावचे विस्थापित व इतिहास अभ्यासक गुरुचरण कुर्डीकर यांनी सांगितले की, कुर्डी हे केवळ पाण्याखाली जाणारे गाव नसून गोव्याच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि विस्थापितांच्या अस्मितेचे प्रतीक आहे.

पावसाळ्यात परिसर दुर्लक्षित राहत असल्याने जिलेटिनद्वारे बेकायदेशीर मासेमारी, ऐतिहासिक वास्तूंची हानी आणि असामाजिक प्रकार वाढत आहेत. त्यामुळे कुर्डीच्या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

स्थानिक नागरिकांनी बेकायदेशीर मासेमारीवर कठोर कारवाई, धोकादायक भागात प्रवेशबंदी, पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था, चेतावणी फलक तसेच पोर्तुगीजकालीन वास्तूंचे शास्त्रीय पद्धतीने जतन व संवर्धन करण्याची मागणी केली आहे. कुर्डी गाव जलाशयाखाली अदृश्य होत असले, तरी या ऐतिहासिक वारशाचे अस्तित्व जपण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे नागरिकांचे मत आहे.

जिलेटिनचा वापर करून मासेमारी ?

पाणी वाढल्यानंतर परिसर ओस पडत असल्याचा गैरफायदा घेत काही समाजकंटक जिलेटिनचा वापर करून बेकायदेशीर मासेमारी करत असल्याची गंभीर तक्रार आहे. या स्फोटांमुळे जलचर संपत्तीचे नुकसान होत असून ऐतिहासिक पोर्तुगीजकालीन इमारती व दगडी संरचनांनाही तडे जाऊन पडझड सुरू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच धोकादायक अवस्थेतील भझ वास्तूंमध्ये काही युवकांकडून मद्यपानाच्या पार्धा आणि इतर गैरप्रकार होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आहे.

वारसा जपण्यासाठी ठोस उपायांची गरज

गावाचे विस्थापित व इतिहास अभ्यासक गुरुचरण कुर्डीकर यांनी कुर्डीच्या ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली. त्यांच्या मते, पावसाळ्यात परिसर ओस पडत असल्याने जिलेटिनद्वारे बेकायदेशीर मासेमारी, ऐतिहासिक पोर्तुगीजकालीन वास्तूंची पडझड वाढत आहे. धोकादायक भग्न वास्तूंमध्ये युवकांची वर्दळही चिंताजनक आहे. बेकायदेशीर मासेमारीवर कठोर कारवाई, धोकादायक भागात प्रवेशबंदी, चेतावनी फलक, सुरक्षा व्यवस्था, पोर्तुगीजकालीन रस्ते, पूल व इमारतींचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT