

सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत असून त्यात गुन्हे अन्वेषण खात्याच्या अटकेत असलेला गौतम खट्टर यांना म्हापसा सरकारी इस्पितळांत उपचारासाठी नेले जात असताना एक मोबाईल घेतलेली व्यक्ती (रिपोर्टर) त्याला विविध प्रश्न विचारतो. खट्टर काहीच उत्तर देत नाही हे पाहून अचानक खट्टरला मारहाण होण्याचा प्रसंग घडला की काय असे या व्हिडिओत पुसटसे दिसत आहे. मात्र, नेमके काय घडले ते स्पष्ट होत नाही, कारण तेथे व्हिडिओ संपतो. यावर हिंदुत्व प्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून गौतम खट्टर गोव्यात सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे.
तुम्ही इतिहासतज्ज्ञ होऊ नका..
काँग्रेसचे आमदार अॅड, कार्ल्स फेरेरा यांनी जुने गोवे येथे असलेल्या हातकातरो खांबावर कुणाचे हात कापल्याचा पुरावा नसल्याचे म्हटले होते. त्यावर इतिहास संशोधकांनी त्यांना तुम्ही इतिहास संशोधक आहात का? तसे होण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्ला दिला आहे. इतिहास संशोधक प्रा. प्रजल साखरदांडे यांनी सदर खांब हा पोर्तुगीज काळात सरकारच्या विरोधकांना म्हणजेच गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठचा होता. तसे तेथे लिहिलेले आहे. इन्क्विझिशनच्या काळात त्याचा वापर झाल्याचे म्हटले आहे. म्हणजेच इन्क्विझिशनच्या काळात जे हिंदूधर्म बदलण्यास तयार होत नसत त्यांना गुन्हेगार ठरवून येथे त्यांचे हात कापले जात होते, हे स्पष्ट होत असल्याचे प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणतात. त्यामुळे राजकीय नेत्यांनी इतिहास संशोधक होण्याचा प्रयत्न केल्यास तोंडघशी पडतात, हे या घटनेवरून स्पष्ट झाले.
एका समाजसेवकाचे पलायन
उत्तर गोव्यातील एक समाज सेवक चंबु गबाळे आवरून पळून गेला आहे. दोन तीन वर्षे तो बराच चर्चेत होता. उत्तर गोव्यातील एका मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी हवा त्याने निर्माण केली होती. आपले अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत असे सांगून नोकरी देण्याच्या बहाण्याने त्याने अनेकांकडून पैसेही उकळले, एका व्यक्तीकडून त्याने नोकरी लावण्यासाठी 30 लाख रुपये घेतल्याची तक्रारही पोलिस स्थानकात नोंद झाली आहे. त्याच्या अनेक लीला ऐकू येत असून त्याची चमकधमक बघून फसलेले अनेक आहेत अशी चर्चा आता होत आहे. आमदारांपेक्षाही अधिक 'विकास' त्याने केल्याचे काही जण सांगतात.
पाण्यावर जडला 'जीव'
वाळपईत अनेक ठिकाणी पाणीटंचाईने नागरिकांचा जीव हैराण झाला आहे. टँकरचे पाणीही वेळेत मिळत नाही अशी लोकांची तक्रार आहे. आता म्हाऊस भागात नळाच्या पाण्यात 'जीव' आढळल्याने खळबळ माजली आहे. मात्र, पेयजल खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता जलवाहिनीत काहीच आढळले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकाच घरात हा प्रकार घडल्याचे खात्याचे म्हणणे आहे. अधिक चौकशीअंती काय ते निष्पन्न होईलच. मात्र सत्तरीत अनेकांचा पाण्यावर जीव जडला आहे तर काही जणांचा जीव टँकरवर जडलेला असल्याने सामान्यांना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे.
मांडवीत नवी इमारत?
आपण नेहमी म्हणतो की ज्या गावाला जायचेच नाही त्याचा पत्ता का विचारा? गोवा सरकारने स्पष्ट केले आहे की नवीन कॅसिनोला परवानगी मिळणार नाही. तर मग कॅसिनो नांगरून ठेवायला परवानगी का देण्यात आली? सध्या या नव्या कॅसिनोला विरोध करण्यासाठी इनफ इज इनफ संघटनेने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू असून सरकार म्हणते परवानगी फक्त नांगरण्यासाठी आहे तर कंपनीचे म्हणणे आहे हे जहाज कॅसिनोसाठीच आहे. या प्रकरणात सरकारची अडचण झाली आहे. हा नवा कॅसिनो म्हणजे अनेक मजली प्रचंड इमारतच आहे. त्यातून नदीत वाढणाऱ्या प्रदूषणाचा विचार सरकारने करायला हवा.
सर्वोच्च न्यायालयानेच कान टोचले
सध्या गौतम खट्टर तुरुंगात आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविरोधातील वक्तव्य त्यांना भोवले आहे. त्यासंदर्भात अनेक वृत्तवाहिन्यांनी चर्चाही घेतल्या. त्यातून वातावरण मूळ वक्तव्यापेक्षा अधिक कसे बिघडेल याची चांगली काळजी घेण्यात आली. अशामुळे समरसता कशी काय येणार देवच जाणे. त्यातील एका चर्चेत धर्मांतरे किंवा अशा वक्तव्यांविरोधात कडक कायदा करावा अशी मागणी करण्यात आली होती. तशी मागणी संस्थेने अनेकदा सरकारला केल्याचे त्यांचे म्हणणे होते. अखेर आता सर्वोच्च न्यायालयानचे केंद्र सरकारला तशी सूचना केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच कान टोचल्याने बरे झाले.
वन मॅन आर्मी
इतिहासतज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर यांना परवा आठवले पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाला. एका योग्य व्यक्तीचा सन्मान झाल्याची सर्वांची भावना आहे. सध्या कोणालाही कसलेही पुरस्कार मिळत असल्याने त्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. अशा वातावरणात आठवले पुरस्कार राजेंद्र केरकर यांच्यासारख्या व्यक्तीला देऊन पुरस्काराची प्रतिष्ठा राखली गेली आहे. त्यांच्यामुळेच राज्यात दोन अभयारण्ये अधिसूचित झाली. गोव्यात वाघ असल्याचा दावा करून त्यांनी तसे पुरावेही सादर केले. म्हादईसाठी गेली कित्येक वर्षे ते लढा देत आहेत. पण काही राजकीय नेत्यांना ते नकोसे झाले आहेत, शांतपणे, योग्य पुराव्यांसह बोलणारे लोक राजकारण्यांना नकोसेच होतात. विशेषतः ज्यांना हांजी हांजीच ऐकायची सवय झाली आहे अशा लोकांच्या डोळ्यात ते खुपतात. गोव्याच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या या वन मॅन आर्मीचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
अल्पसंख्य आमदारांची सतावणूक ?
दोनापावल येथे मंत्री विश्वजीत राणे यांच्या बंगल्यावर नेलेल्या मोर्चामुळे सरकारने काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यात विशेषतः विरोधी पक्षांतील नेत्यांचा सहभाग आहे. कारण या आंदोलनात तेच आघाडीवर होते. सोमवारी जबाब नोंदवण्यासाठी काही जणांना बोलावण्यात आले होते. आम आदमी पार्टीचे वेंझी व्हिएगस यांनी आरोप केला आहे की सरकार अल्पसंख्य आमदारांची सतावणूक करत आहे. प्रथमदर्शनी हा आरोप खराच वाटू शकतो. सध्या विरोधी पक्षात सर्वच अल्पसंख्य आमदार आहेत. या आंदोलनापासून विजय सरदेसाई यांनी स्वतःला दूर ठेवले होते, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला नाही. एखादी वस्तुस्थिती खरी असते, मात्र ती आपल्या सोयीने कशी फिरवून सांगावी हे राजकारण्यांना कुणी शिकवायची गरज नाही.-