पेडणे : पुढारी वृत्तसेवा
पेडणे महालाच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासात कोरगाव येथील शेट्ये बंधूंच्या चौपाटीतील गणपतीला अनन्यसाधारण महत्व आहे. अनेक पिढ्यांपासून जपली गेलेली ही परंपरा आजही श्रद्धा, भक्तिभाव आणि राजेशाही थाटात सुरू आहे. गणेश चतुर्थीच्या काळात हजारो भाविक या गणपतीच्या दर्शनासाठी चौपाटीवर गर्दी करतात.
चौपाटीतील शेट्ये कुटुंबांची संख्या दीड हजारांच्या आसपास पोहोचली असली, तरी कोणत्याही कुटुंबाने स्वतंत्रपणे गणपती पूजलेला नाही, हे या परंपरेचे वैशिष्ट्य आहे. चतुर्थीला सर्व कुटुंबीय मूळ गावी परत येऊन एकाच गणपतीसमोर एकत्र नतमस्तक होतात. त्यामुळे हा गणपती धार्मिक श्रद्धेसोबतच कुटुंबीय एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला आहे.
या गणपतीची मूर्ती अन्यत्र तयार करून आणली जात नाही. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर नामांकित मूर्तिकार चौपाटीवर येऊन तिथेच मूर्ती साकारतो. सुमारे ९ ते १० फूट उंचीची ही मूर्ती राजेशाही थाटात घडवली जाते. एका वर्षी फेटाधारी गणपती, तर दुसऱ्या वर्षी मुकुटधारी महागणपती अशा स्वरूपात मूर्ती साकारली जाते. मूर्तीच्या सजावटीतही पारंपरिकतेचा ठसा जपला जातो.
गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी बारा वाजता मूर्तिकाराचा विधिवत मान-सन्मान व पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत गणरायाची 'नजर उघडण्याचा' पारंपरिक विधी पार पडला. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा आणि आरती करून गणेशोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
या गणपतीच्या पूजेचा मान परंपरेने इंच्छेटे घराण्याकडे आहे. पूर्वी राजघराण्यात पूजला जाणारा हा गणपती असल्याची परंपरागत माहिती सांगितली जाते. कोरगाव चौपाटी येथील मूळ बारा कुटुंबे राजघराण्याशी संबंधित असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे उत्सवात आजही राजेशाही परंपरेची झलक भाविकांना पाहायला मिळते.
काळ बदलला, कुटुंबांचा विस्तार झाला आणि नव्या पिढ्या शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त विविध ठिकाणी स्थायिक झाल्या. मात्र गणेश चतुर्थी आली की आपल्या मूळ गावाकडे परतण्याची ओढ कायम आहे. देश-विदेशात स्थायिक झालेले कुटुंबीयही शक्यतो या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे हा गणेशोत्सव कुटुंबांना आणि पिढ्यांना एकत्र आणणारा सांस्कृतिक सेतू ठरला आहे.
या गणपतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात नाही. उत्सव संपल्यानंतर मूर्ती जागेवरच ठेवली जाते. पुढील वर्षी नवीन मूर्ती साकारण्यापूर्वी जुन्या मूर्तीचे विधिपूर्वक विसर्जन केले जाते. ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे.