वाळपई : पुढारी वृत्तसेवा
सत्तरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे मंगळवारी दिवसभर विविध ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर तसेच वीजवाहिन्यांवर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. वाळपई अग्निशामक दलाने झाडे हटवून वाहतूक पूर्ववत केली.
खडकी येथील श्रीराम मंदिराजवळ घडली. आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अग्निशामक कर्मचारी श्री दत्ताराम आर. देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेत झाड हटविले. या मोहिमेत अशोक व्ही. नाईक आणि उमेश आर. गावकर यांनी सहभाग घेतला.
या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. ब्रह्मकरमळी बसथांब्याजवळ वाळलेले झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर पाडेली बसथांब्याजवळ फणसाचे झाड रस्त्यासह वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वाहतूक आणि वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली.
वाळपई अग्निशामक दलाने तत्काळ झाड हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. सत्तरीतील रावण कॉलनी परिसरातील श्री सातेरी मंदिराजवळ गुलमोहर रस्ता आणि वीजवाहिन्यांवर कोसळला.
वरिष्ठ अग्निशामक कर्मचारी पी. एस. गावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. वाळपई नगरपालिका उद्यान परिसरात गुलमोहराच्या झाडाची मोठी फांदी तुटून पडण्याच्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. अग्निशामक जवान रामा वाय. नाईक यांनी वेळेत कारवाई करून संभाव्य दुर्घटना टळली.