Goa Night Club Fire Case  File Photo
गोवा

Goa Night Club Fire Case | पोलिसांनी ऑपरेटर मॅनेजरच्या झारखंडमध्ये आवळल्या मुसक्या

Goa Night Club Fire Case | हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमधील अग्नितांडव प्रकरणी क्लबचा ऑपरेटर मॅनेजर विजय कुमार सिंग (रा. झारखंड) याला हणजूण पोलिसांनी झारखंडमधून अटक केली.

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमधील अग्नितांडव प्रकरणी क्लबचा ऑपरेटर मॅनेजर विजय कुमार सिंग (रा. झारखंड) याला हणजूण पोलिसांनी झारखंडमधून अटक केली. या दुर्घटनेनंतर संशयित आपल्या मूळ गावी पसार झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे.

ही भीषण आग दुर्घटना ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री घडली होती. या अग्नितांडवमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला होता, तर सहाजण जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच पर्यटक आणि २० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. याप्रकरणी पोलिसांनी क्लबचे सरव्यवस्थापक विवेक चंद्रभान सिंग (उत्तर प्रदेश), गेट मॅनेजर प्रियांशू कृष्णकुमार ठाकूर (दिल्ली), बार मॅनेजर राजवीर रूद्रनाथ सिंघानिया (उत्तर प्रदेश), मुख्य सरव्यवस्थापक राजीव कुमार मोडक (दिल्ली), गोवा प्रमुख भरत सिंग कोहली (दिल्ली) यांच्यासह मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा व अजय गुप्ता (सर्व रा. दिल्ली) या आठ जणांना अटक केली होती.

यातील संशयित प्रियांशू ठाकूर व राजवीर सिंघानिया यांना जामीन मिळाला आहे. दुर्घटना घडल्यानंतर संशयित विजय सिंगने गोव्यातून पलायन केले होते. हा प्रकार समोर आल्यावर गोवा पोलिसांनी संशयिताला पकडून आणण्यासाठी हणजूण पोलिसांचे पथक झारखंड येथे पाठवले होते. संशयिताला अटक करून हे पथक गोव्यात दाखल झाले.

पोलिसांनी संशयिताला दुर्घटना प्रकरणी रितसर अटक केली. पोलिसांनी भा. न्या.सं.च्या १०५, १२५, १२५ (अ), १२५ (ब), २८७ व ३(५) कलमान्वये याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सूरज गावस करत आहेत.

दरम्यान, संशयित सरव्यवस्थापक विवेक सिंग यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जात ऑपरेशनल मॅनेजर विजय कुमार सिंग याच्या नावाचा उल्लेख केला आहे. दुर्घटनेतील क्लबचे दैनंदिन व्यवहार विजय कुमार सिंग आणि असोसिएट उपाध्यक्ष सर्व्हिस हे पहात असल्याचे अर्जात नमूद केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT