Goa Night Club 
गोवा

Goa Night Club | गोव्यात रात्रीच्या कर्कश संगीताला चाप; जानेवारीत 28 आस्थापनांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसा

Goa Night Club | जीएसपीसीबी यंत्रणा सक्रिय : निरीक्षणप्रणाली २४ तास कार्यान्वित

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

रात्रीच्या वेळी कर्कश संगीतामुळे होणाऱ्या मोठ्या आवाजाच्या तक्रारी वाढल्यानंतर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (जीएसपीसीबी) ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.

यावर्षी जानेवारी महिन्यात सुमारे २८ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गेल्या डिसेंबरपासून मंडळाने ध्वनिनिरीक्षण प्रणाली २४ तास कार्यान्वित केली असून, उल्लंघनांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या तीन पाळ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

राज्यातील विविध आस्थापनांमध्ये ३८ ऑनलाईन ध्वनी निरीक्षण प्रणाली बसवण्यात आल्या असून, त्याद्वारे सातत्याने आवाजाची पातळी नोंदवली जाते. या प्रणालींव्यतिरिक्त पाळोळे, केळशी, बाणावली, कळंगुट, हणजूण, कँडोलीम, वागातोर आदी किनारी भागांतील ध्वनी निरीक्षण केंद्रांचाही वापर केला जात आहे.

अधिकृत सूत्रांनुसार, जानेवारी महिन्यात निरीक्षण अधिक कडक केल्यानंतर २८ आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारींमुळे अंमलबजावणीला अधिक बळ मिळाले असून, जीएसपीसीबीने हेल्पलाईन क्रमांकही सुरू केला आहे.

या क्रमांकावर तक्रार आल्यावर मंडळाचे अधिकारी त्वरित त्या ठिकाणी जाऊन आवाजाची क्षमता डेसिबल यंत्रणेने मोजमाप करत आहेत. रात्री उशिरा परवानगी असलेल्या वेळेनंतर म्युझिक वाजवणाऱ्यांविरुद्धही कारवाई केली जात आहे असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्रीकृत निरीक्षण कक्षातील कर्मचारी व्हॉटस् अॅप संदेश आणि ई-मेलद्वारेही पोलिसांना कारवाईसाठी कळवतात. संध्याकाळी ८ ते रात्री १ या वेळेत सर्वाधिक तक्रारी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आठ तासांच्या कालावधीत निर्धारित ध्वनी मर्यादा ओलांडल्याचे आकडेवारीत आढळल्यास संबंधित आस्थापनाला कारणे दाखवा नोटीस देण्यात येते. सातत्याने उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला जातो तसेच कारवाई केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT