

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
आगरवाडा-चोपडे सीमेवरील एका ड्रिलिंग युनिटने पारंपरिक ओहोळावर पक्के बांधकाम करून पाण्याचा प्रवाह अडवल्याप्रकरणी जलसिंचन खात्याने कडक पावले उचलली आहेत. या तक्रारीची दखल घेत खात्याचे अधीक्षक प्रदीप नाईक यांनी आपल्या पथकासह घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली.
याविषयी जलसिंचन खात्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. येथील पारंपरिक मीठ व्यावसायिक आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ड्रिलिंग युनिटने नियमांचे उल्लंघन करून कुंपण आणि पक्के बांधकाम केले आहे. यामुळे डोंगर माथ्यावरून येणारे पाणी अडवले गेल्याने पावसाळ्यात भातशेती आणि मिठागरांत मोठ्या प्रमाणात पाणी साचते.
चोपडे येथून मिठागराकडे जाणारी पारंपरिक पायवाट पूर्णपणे बंद झाली आहे. याविषयी लेखी तक्रारी करूनही अद्याप त्याची कोणीच दखल घेतलेली नाही. दरम्यान, स्थानिकांनी ग्रामसभेतही यावर आवाज उठवून संबंधित बिगर गोमंतकीय मालकावर कारवाईची मागणी केली आहे.
कडक कारवाईचे संकेत
तक्रार केल्यानंतर जलसिंचन खात्याचे अधीक्षक प्रदीप नाईक यांनी पाहणीनंतर स्पष्ट केले की, या अतिक्रमणाचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. नियमबाह्य पद्धतीने केलेल्या या बांधकामावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी स्थानिकांना दिले आहे.