पणजी ः दोन्ही जि. पं. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात उत्तर गोवा जि. पं. अध्यक्षपदासाठी भाजपकडून रेश्मा संदीप बांदोडकर व उपाध्यक्षपदासाठी नामदेव बाबल च्यारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दक्षिण गोव्यात अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे सिद्धार्थ गावस देसाई, तर काँग्रेसकडून लुईझा रॉड्रिग्ज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून अंजली अर्जुन वेळीप आणि गोवा फॉरवर्डतर्फे इनासिना पिंटो यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे उत्तर गोव्यात बिनविरोध, तर दक्षिण गोव्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्ष मंगळवारी 30 रोजी होणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी रविवारी दोन्ही जि. पं. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी रेईश मागूस जि.पं. मतदारसंघातून निवडून आलेल्या रेश्मा बांदोडकर व होंडा जि. पं. मतदारसंघातून निवडून आलेले नामदेव च्यारी यांनी अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले. यावेळी भाजपचे नेते गोविंद पर्वतकर उपस्थित होते.
जि. पं. ला जादा अधिकारांची शक्यता...
माजी जि. पं. अध्यक्ष व विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक म्हणाले की, जिल्हा पंचायतीची चालू असलेली कामे पूर्ण केली जातील आणि नवी कामे सुरु केली जातील. जि.पं. ला यावेळी जादा अधिकार मिळण्याची आशा आहे. तसे झाल्यास जि.पं.ची कामेही वाढतील. सर्व जिल्हा पंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन जिल्हा पंचायतीत येणाऱ्या भागांचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.