

पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पक्षाचे माजी गोवा प्रदेश प्रवक्ते व २०२२ मधील विधानसभा निवडणुकीतील सावियो रॉड्रिग्ज वेळ्ळी मतदार संघाचे उमेदवार सावियो रॉड्रिग्ज यांनी भाजपच्या एका आमदाराने भाजप पदाधिकाऱ्याकडून दहा लाख रुपये एका कामासाठी घेतले आणि नंतर आपण आवाज उठवल्यानंतर परत केल्याचे प्रकरण उघडकीस आणले आहे.
त्यामुळे भाजप प्रदेश समितीमध्ये आणि असरकारमध्ये खळबळ माजली असतानाच गुरुवारी रॉड्रिग्ज यांनी या प्रकरणाची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्याचे सांगितले.
भाजप पदाधिकाऱ्यांची एक फाईल पुढे करण्यासाठी दहा लाख रुपये आमदाराने घेतले होते. हे प्रकरण आपण उघड केल्यानंतर हे प्रकरण प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले. याची चौकशी सुरू होताच सदर आमदाराने सदर पैसे परत केले. मात्र अशाप्रकारे भाजप पदाधिकाऱ्यांला जर आपल्या पक्षाच्या आमदारांना लाच द्यावी लागत असेल तर सर्वसामान्यांचे काय ?
हा आपला प्रश्न असून गोव्यामध्ये कचरा समस्या आहे, त्याचबरोबर पर्यटन क्षेत्रामध्ये अनेक बेकायदेशीर गोष्टी सुरू आहेत. तरी सरकार काहीही करत नाही. याप्रकरणीही आपण पंतप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार केल्याचे रॉड्रिग्ज यांनी सांगितले. आपण भाजप प्रदेश समितीचा सदस्य आहे.
मात्र प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे आपण राज्य कार्यकारिणी सदस्य नसल्याचे सांगत आहेत. तसे असल्यास आपणाला सदर पदावरून काढल्याची कोणतीही सूचना नाईक यांनी दिली नसल्याचे सांगून यापुढे आपण सरकारमधील भ्रष्टाचार प्रकरणे उघडकीस आणणार असल्याचा इशारा रॉड्रिग्ज यांनी दिला आहे.