पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील दोन्ही जिल्हा पंचायतीवर भाजप युतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे. दोन्ही ठिकाणी भाजपवर लोकांनी विकासाला मत दिले असून ग्रामीण विकासावर भर देण्यासाठी जिल्हा पंचायतीतील विजय सहय्यभूत ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सोमवारी पणजी येथील भाजप कार्यालयात संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, खासदार सदानंद शेट तानावडे व माजी खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, लोकांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे. विरोधकांनी अनेक दावे केले, आरोप केले मात्र सर्व फोल ठरले. उत्तर गोव्यात भाजपला मोठे बहुमत मिळाले असून दक्षिणेतही बहुमत मिळाले आहे.
काही ठिकाणी कमी मतांनी भाजप उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यावर विचार केला जाईल. येत्या विधानसभनिवडणुकीपूर्वी तेथे काम वाढवले जाईल, असेही ते म्हणाले. ते म्हणाले, ईव्हीएम वर शंका उपस्थित करणाऱ्यांना मतदान पत्र के. द्वारे भाजपला मिळालेले हे यश एक मोठी चपराक आहे. या विजयामध्ये म्हजें घर योजनेचा मोठा वाटा असल्याचेही ते म्हणाले.
हा विजय विधानसभा निवडणुकीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे सांगून ८० टक्के जागा भाजपने जिंकल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दामू नाईक म्हणाले, निकाल भाजपच्या समर्थनार्थ आहे. भाजप शिवाय पर्याय नाही हे दर्शविणारा हा निकाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यावर लोकांनी विश्वास दाखवलेला असल्याचे ते म्हणाले.