पणजी : पुढारी वृत्तसेवा
मतदार पडताळणी (एसआयआर) मोहीम राबवून मतदारांची पडताळणी केल्यानंतर राज्यातील १ लाख ४२ हजार नावे वगळली आली आहेत. राज्य मुख्य निवडणूक आयोगाने मसुदा मतदार यादी जाहीर केली होती.
या यादीबाबत लोकांना आक्षेप व सूचना नोंद करण्यास कालावधी दिला होता. त्यानुसार दि. १७ ते २६ डिसेंबर पर्यंत ९७५ आक्षेप नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मसुदा मतदार यादीतील आक्षेप व सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी ९१५, तर नाव वगळण्यासाठी ६० अर्ज आले आहेत. यादीबाबत राजकीय पक्षांकडून एकही आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही.
मसुदा यादीत नाव घालणे अथवा वगळण्यासाठीची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२६ पर्यंत आहे. एसआयआरनंतर आयोगाने मतदार यादीतून १ लाख ४२ मतदारांची नावे वगळली आहेत, तर १ लाख ८२ हजार ४०३ मतदार मॅप झालेले नाहीत.
मॅपिंग न झालेल्या मतदारांची नावे मसुदा यादीमध्ये समाविष्ट केली आहेत. या मतदारांना ते भारतीय नागरिक असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
या मतदारांना यापूर्वी नोटीस पाठवल्या आहेत. त्यावर सुनावणीची तारीख आणि वेळ देण्यात आली आहे. या सुनावण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सरकारचे ध्येय आहे. याशिवाय मृत मतदार वगळता नावे वगळण्यात आलेल्या अन्य मतदारांना देखील संधी देण्यात आली आहे. आपले नाव चुकीच्या पद्धतीने काढण्यात आले आहे, असे वाटत असल्यास असे मतदार अर्ज भरू शकतात. सर्व कागदपत्रे योग्य असल्यास त्यांचे नाव अंतिम मतदार यादीमध्ये येणार आहे.
7 फेब्रुवारीपर्यंत सुनावण्या...
आक्षेपांबाबतच्या सुनावण्या 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत निकाली काढण्यात येतील, तर 14 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल, असेही आयोगाने कळविले आहे.